शेतकरी, सर्वसामान्य घटक हताश : समस्यांची दाहकता सोसवेना राजेंद्र वारघडे पाबळ – महाराष्ट्रातील राजकीय पटलावर अस्तित्वासाठी आणि स्वहितासाठी कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. राज्यात ज्वलंत प्रश्न असताना सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरून राजकीय पक्ष कुरघोडीच्या राजकारणात बेफाम झाले आहेत. त्याचवेळी अतिवृष्टी, महागाई आदी मूलभूत समस्यांनी बेजार झालेला मतदार समस्या सांगायच्या कोणाला, याचे उत्तर शोधत आहे. यातून मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्याची दाहकता सर्वच पक्षांना मतदानातून सोसावी लागणार असल्याची चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शोध- प्रतिशोधातून निर्माण झालेली अपरिहार्यता ही विरोधी पक्षासह सत्ताधारी राजकारणी नेत्यांना राज्य शकट हाकताना मजबूर करून गेली आहे. अर्थात आगामी निवडणुका होईपर्यंत हे प्रश्न हाताळावे लागणार आहे. या वस्तुस्थितीकडे 2024 मधील निवडणुकीत मतदार दुर्लक्ष करतील का, सर्वच पक्षांसह नेत्यांना जमिनीवर आणतील, हा खरा प्रश्न आहे. एक वर्षांपूर्वी करोना या महासाथीचा बीमोड झाला. त्यापूर्वी तब्बल दोन वर्षे सर्वसामान्य अंधार कोठडीत जगत होते. त्यातून अनेक कुटुंबे नष्ट झाली आहेत. जगल्या वाचलेल्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. ते नव्या उमेदीने सुरू होत असताना राजकीय क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. याची मोठी झळ ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना बसत आहे. त्यांच्यादृष्टीने दैनंदिन गरजा महत्त्वाच्या असतात. कष्ट करून कशीबशी तोंडमिळवणी करीत संसाराचा गाडा चालवताना गॅसपासून सर्वच वस्तू जीएसटीच्या भाराने दुप्पट किमतीने वाढल्या आहेत. हेच सर्वसामान्य, कंटाळले आहेत. त्यामुळेच कदाचित सर्वच पक्षांना निवडणुका सोप्या असणार नाहीत, हे निश्चित असल्याचे मतदार बोलत आहेत, हे वास्तव दिसत आहे. तोंडमिळवणीसाठी काथ्याकूट सुनेला बरोबर घेऊन गॅस सिलिंडर न्यायला आलेली महिला गॅसची बचत करून सहा सहा महिने सिलिंडर पुरवत होती. फक्त पाहुणे आले तर चहासाठी उपयोग करताना इतरवेळी काटक्या कुटक्यावर तर कधी कधी रॉकेलचा वापर करून स्वयंपाक करीत असे. आता 1100 रुपयांचा सिलिंडर घेऊन कसा संसार करायचा, असा प्रश्न आपला संताप व्यक्त करीत होत्या.