महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कंपनीने भरपाई द्यावी रांजणगाव गणपती – विधानसभा निवडणुकीचा धुराळा शांत झाला आहे. महाविकास आघाडीला धूळ चारत महायुतीचे सरकार राज्यात सरकार स्थापन करणार आहे. मात्र, या गदारोळात रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर ली. कंपनीचे आंदोलन शांत झाले होते. या आंदोलनाला पुन्हा तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा शिरुर-आंबेगाव काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे व निमगाव भोगी ग्रामस्थांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी जून महिन्यापासून पंचक्रोशीतील ग्रामपंचायती, निमगाव भोगी ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पुणे-नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. कंपनीच्या गेट समोर दोन दिवसांचे लाक्षणिक आंदोलन केले होते. सध्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या प्रदुषणाचा विषय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र, प्रशासन या वाढत्या प्रदुषणाकडे डोळेझाकपणा करीत आहेत. दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे व वापरण्याच्या पिण्याचे स्त्रोत खराब झाले आहेत. त्यामुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर कंपनीचे शासनाने दिलेले वाढीव क्षेत्र रद्द करण्यात यावे. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. हे आंदोलन पुन्हा तीव्रतेने सुरु करण्याचा इशारा निमगाव भोगी ग्रामस्थ व यशवंत पाचंगे यांनी दिला आहे. साथीचे आजार बळावले गावात लोकांच्या आरोग्याचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जमीनी नापीक झालेल्या आहेत. पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झालेले आहेत. त्या पाण्यामुळे लोकांना अनेक साथीचे रोग उद्भवले असल्याचे सरपंच उज्ज्वला अंकुश इचके, माजी सरपंच सचिन सांबारे, लक्ष्मण सांबारे, उत्तम व्यवहारे यांनी सांगितले आहे.