Pune District : पुरंदरमधील महत्त्वाचे प्रकल्प गती घेणार

रवींद्र चव्हाण : संजय जगतापांचा अधिकृत भाजपमध्ये प्रवेश
सासवड – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुरंदरमधील महत्त्वाचे प्रकल्प गती घेणार आहेत. यामध्ये पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणी योजना, रेशीम उद्योग, सहकार चळवळ, आणि नदीजोड प्रकल्प यांचा समावेश आहे. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी व पुरंदरचा विकास करण्यासाठी संजय जगताप यांचा पक्ष प्रवेश होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
सासवड, (ता. पुरंदर) येथे पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होत माजी आमदार संजय जगताप यांनी बुधवारी (दि. 16 जुलै) भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला, त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सरचिटणीस राजेश पांडे, वासुदेव काळे, मकरंद देशपांडे, गणेश भेगडे, रवी अनासपुरे, जालिंदर कामठे, बाबा जाधवराव, स्नेहल दगडे, अजिंक्य टेकवडे, सचिन लंबाते, राणी भोसले, गणेश बीडकर, तानाजी थोरात, साकेत जगताप, अमोल जगताप आदींचा समावेश होता.
संजय जगताप यांच्यासोबत पुरंदर-हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, साखर कारखान्याचे संचालक, नगरपालिकांचे माजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, मार्केट कमिटी व खरेदी-विक्री संघांचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच-उपसरपंच, विकास सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि काँग्रेसचे माजी पदाधिकारी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी, सूत्रसंचालन महेश राऊत, सागर जगताप, जालिंदर काळे यांनी तर शहराध्यक्ष आनंद जगताप यांनी आभार मानले.
भाजप केवळ राजकारणाचा नव्हे तर विकासाचा पक्ष आहे. संस्थात्मक कार्य आणि सामाजिक सलोखा या मूल्यांवर भाजप चालतो. विमानतळ, कर्हा-नीरा-गुंजवणी नदीजोड प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी विस्तारीकरण, उच्च शिक्षण प्रकल्प, जलजीवन योजना या क्षेत्रांतील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
– संजय जगताप, माजी आमदार
जगताप कुटुंबीय व टेकवडे कुटुबांचे यांचे अतूट नाते असून स्व. चंदूकाका जगताप यांच्या प्रयत्नामुळे माजी आमदार अशोक टेकवडे यांना संधी मिळाली तर होती तर माजी आमदार अशोक टेकवडे आज कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण पूर्व नियोजित परदेशी दौरा असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
– अजिंक्य टेकवडे, सरपंच, जवळार्जुन,





