Pune District : उन्हाचा फूल शेतीला फटका

चिंबळी : सध्या विविध उत्सव आणि यात्रांचा हंगाम सुरू आहे. या यात्रा, जत्रा, उत्सवांमुळे फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण होते, त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक फायद्यासाठी फुलांची शेती करण्याचा उत्तम पर्याय मिळतो. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकर्यांनी झेंडू फुलांची लागवड केली होती, मात्र लहरी वातावरणामुळे फूल शेतीला जबदस्त फटका बसला आहे. तीव्र उन्हामुळे फुले कोमजली असल्याने निम्म्याने उत्पादनात घट झाल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.
स्थानिक ग्रामदैवतांच्या यात्रेला व लग्न समारंभांना मोठ्या प्रमाणावर फुलांची मागणी असते, ज्यामुळे शेतकर्यांना आर्थिक फायद्याची आशा होती. पाणी आणि खत वेळेवर देऊन शेतकर्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून झेंडूच्या रोपांची योग्य देखभाल केली होती, त्यामुळे बळीराजा अपेक्षित उत्पन्नाची आशा होती; मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. पहाटे ढगाळ हवामान, तर दुपारी कडक उष्णता यामुळे शेतकर्यांच्या झेंडू फुलांवर गंभीर परिणाम झाला आहे. यामुळे त्यांचे फुलांचे उत्पादन कमी झाले आहे आणि शेतकर्यांच्या चेहर्यावर चिंता दिसू लागली आहे.
आम्ही खूप मेहनत घेतली होती. झेंडूचे रोपांचे योग्य पालन-पोषण करून त्याला वेळेवर पाणी आणि खत दिले. पण अचानक बदललेल्या हवामानामुळे फुलांची स्थिती वाईट झाली. काही फुले आता सुकली आहेत आणि काही फुले फुलीच नाही, त्यामुळे उत्पन्न कमालीचे घटले असल्याचे बळीराजचे म्हणणे आहे.
दर कमी किंवा विकत घेणे ही टाळले
शेतकरी वर्गाने काही फुलांच्या सुकलेल्या अवस्थेमुळे स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजारात काही व्यापार्यांनी कमी भावात फुले विकत घेतली, तर काही व्यापारी त्या विकत घेत नाहीत. परिणामी, शेतकर्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.
चिंबळी : झेंडूने लगडली फुले तीव्र उन्हामुळे लगेच सुकु लागली आहेत.





