पुणे जिल्हा : पारगावच्या घोड नदीपात्रात अवैध वाळूउपसा सुरूच

* शासकीय वाळू लिलावात शासकीय नियमांची पायमल्ली
* पारगाव ग्रामपंचायतीने निवेदन देऊनही महसूल विभागाचे दुर्लक्ष
मंचर – पारगाव (ता. आंबेगाव) येथील घोड नदीपात्रात शासकीय वाळू लिलावात शासकीय नियमांची पायमल्ली करून अवैध वाळू उपसा सुरू आहे. तो तातडीने बंद करावा, अशी मागणी पारगाव ग्रामपंचायतीने करूनही महसूल विभाग मात्र आर्थिक व्यवहारामुळे डोळ्यावर पट्टी बाधून बसल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. शासनाने येथील वाळू लिलाव तातडीने बंद करून चौकशी करावी, अशी मागणी पारगाव ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून केल्याची माहिती सरपंच श्वेता ढोबळे आणि उपसरपंच नितीन ढोबळे यांनी दिली.
पारगाव येथील घोडनदी पात्रात सहा महिन्यापासून शासकीय वाळू उपसाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. संबंधित ठेकेदारांकडून शासनाच्या नियमानुसार वाळूचे वाटप होत नसल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. तसेच वाळू डेपो आणि वाळूची उचल नियमानुसार होत नाही, वाळूची विक्री वजनानुसार होत नाही, वजन काटे अस्तित्वात नाहीत, वाळू डेपोवर सीसीटीव्ही बसवलेला नाही, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना नियमानुसार नंबर प्लेट बसवलेली नाही. तसेच जीपीएस यंत्रणा बसवलेले नाही,
वाळूची वाहतूक सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत होणे गरजेचे असताना रात्रंदिवस वाहतूक केली जाते. शासकीय घरकुल लाभार्थ्यांना वारंवार मागणी करूनही वाळू पुरवठा केला जात नाही. घोडनदी पात्रालगत असणाऱ्या भीमाशंकर साखर कारखाना तसेच इतर चार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी असून रात्रंदिवस वाळू उपसा तसेच वाहन व पोकलेन मशीन यांच्यामुळे नदी पात्रालगत असणाऱ्या पिण्याच्या विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लिलाव बंद करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. शासकीय दराने नागरिकांना वाळू मिळावी हा शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे आतापर्यंत आंबेगाव तालुक्यात किती कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळाला याची शासनाने यादी जाहीर करावी. म्हणजे खरच किती जणांना वाळू मिळाली की फक्त त्यांच्या नावावर वाळू वाटप झाली आहे. परंतु त्यांना प्रत्यक्षात वाळू मिळालीच नाही. किंवा त्यांचे कोणतेही बांधकाम सुरू नाही ही बाब निदर्शनास येईल, असे नागरिकांनी म्हणणे आहे.
संबंधित ग्रामपंचायतीचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. मंडलधिकारी आणि तलाठी यांना पारगाव येथे पाठवून होत असलेल्या वाळू उपसा नियमानुसार होतं का नाही याची पाहणी करून अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
– संजय नागटिळक, तहसीलदार,आंबेगाव, घोडेगाव.
तहसीलदारांनाा निवेदन…
पारगाव येथील घोडनदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे नदी पात्रात असणाऱ्या खड्ड्यामुळे शेती पंप काढण्याच्या प्रयत्नात काही शेतकऱ्र्यांना धोका होऊ शकतो. या संदर्भात तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदन दिल्याचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी सांगितले.





