Pune District : नवीन पूल बांधायला पैसे नसतील, तर दुरुस्त तरी करा!

तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील कालव्यावरील पूलाची अवस्था गंभीर
लोणी काळभोर – पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या मालकीचा सुमारे 60 वर्षे जुना पूल सध्या अतिशय धोकादायक स्थितीत आहे. नवीन पूल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने हात झटकले आहेत. पण नवीन पूल शक्य नसेल, तरी किमान सध्याच्या पुलाची तातडीने दुरुस्ती तरी करा, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 6312 पुलांची तपासणी केली असून, त्यातील 61 पूल धोकादायक ठरवून पाडण्याचे आदेश दिले आहेत; मात्र लोणी काळभोर येथील या पुलाच्या सुरक्षेबाबत कुठलीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पूल पडून जीवितहानी झाल्यावरच उपाययोजना होणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या पुलाची स्थिती एवढी गंभीर आहे की, स्ट्रक्चरल ऑडिट न करताही कोणीही पाहून सांगू शकतो की हा पूल धोकादायक आहे. तरीदेखील केवळ ’पूल बंद आहे’ असे बोर्ड लावून प्रशासनाने जबाबदारी झटकली आहे. प्रत्यक्षात मात्र, या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे सरकारच्या उदासीनतेविषयी नागरिकांमध्ये असंतोष आहे. पुणे शहरातील पुलांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ उपाय, पण आमच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित होत आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे संकेत, पण कृती कधी?
रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील धोकादायक पुलांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून दुरुस्ती करण्याचे संकेत दिले. यासंदर्भात समिती स्थापनेची घोषणाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिवेशनात केली आहे. तरी रामदरा पुलाबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
नवीन पूल कधी? दुरुस्ती आत्ताच हवी!
स्थानिकांचे म्हणणे आहे की, नवीन पूल बांधण्यासाठी शासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत किमान दोन वर्षांचा कालावधी जाईल. तोपर्यंत नागरिकांनी धोका पत्करून या धोकादायक पुलावरून प्रवास करायचा का? त्यामुळे तातडीने दुरुस्ती करून पूल चालू स्थितीत ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाचे बोर्ड लावून हात झटकणे धोरण
रामदरा रस्त्यावरील पूल अजिबात सुरक्षित नाही, हे सर्वसामान्य नागरिकही स्पष्ट सांगतात. मात्र प्रशासनाने फक्त ‘अवजड वाहतूक बंद’ अशा फलकाच्या माध्यमातून पूल बंद असल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात सर्व प्रकारची वाहतूक सुरूच आहे. धोका ओळखूनही दुर्लक्ष केल्यास संभाव्य दुर्घटनेला जबाबदार कोण?





