पुणे जिल्हा : दमदाटी केली तर लोकांचे मतपेटीतून उत्तर

युगेंद्र पवार : माळेगाव खुर्दमध्ये गावकऱ्यांशी संवाद
बारामती – गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ शदर पवारांना साथ देणारी बारामतीची जनता प्रामाणिक व एकनिष्ठ आहे. या जनतेचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी चुकीच्या विचारांना, प्रवृत्तीला आणि वागणुकीला कधीच थारा दिलेला नाही. त्यामुळे यंदा लोकसभेच्या निर्णायक लढाईत सर्वसामान्य बारामतीकरांनी स्वाभिमानाने तुतारी वाजवली.
बारामतीच्या जनतेचे वेगळेपण फक्त शरद पवारांनाच समजते. म्हणून कुणी कितीही आदळआपट आणि दमदाटी केली, तरी अशा लोकांना मतपेटीतून जाग्यावर आणण्याचा निर्धार बारामतीच्या जनतेने केला आहे. विधानसभेलाही स्वाभिमानाची लढाई यशस्वी करून तुतारीच वाजवतील, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील ग्रामस्थांशी ते बोलत होते. याप्रसंगी तालुक्याच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही उपस्थित ग्रामस्थांनी दिली. प्रचार दौऱ्यात त्यांनी थोपटेवाडी, कुरणेवाडी, लाटे, माळवाडी, म्हसोबावाडी, मानाजीनगर, धुमाळवाडी, पवईमाळ सोनकसवाडी, पणदरे आणि पाहुणेवाडी येथे भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सुध्दा युगेंद्र पवार यांना शहरी व ग्रामीण भागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी महिलांकडून त्यांचे औक्षण केले जात आहे. तरूणाईंची साथ, जेष्ठांचा आशीर्वाद आणि महिलांची सोबत त्यांना मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
ते म्हणाले की, शहरात वरवरचा विकास दिसत असला तरी बेरोजगारी, पाणी प्रश्न, महिला सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, पार्किंग आणि कायदा व सुव्यवस्था यासोबतच आपल्या भागातील पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे.
युगेंद्र पवार म्हणाले की, मतदारसंघातील माय-बाप जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी, महिलांचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपण सर्वजण कार्यरत राहू. कारण, आपल्याला शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्षात साकार करायची आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली रयतेचे राज्य आणण्यासाठी आपण सर्वांनी मोलाची साथ द्यावी. असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.





