Pune District: मुळशीच्या पाण्यासाठी आशा पल्लवित

पारगाव : शेतीच्या पाण्यावर सूक्ष्म अभ्यास असणारे व मुळशीचे पाणी पूर्वमुखी वळविणारच हा विडा उचलणारे दौंडचे आमदार राहूल कुल यांच्या अनेक वर्षाच्या पाठपुराव्याला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. हवेली, दौंड, शिरूरच्या शेतकऱ्यांना आता मुळशीच्या पाण्यासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. या पाण्याची आता जास्त काळ वाट पहावी लागणार नाही.
आमदार कुल यांच्या मागणीनुसार जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सुर्वे समितीचे सादरीकरण करण्यासाठी नुकतीच बैठक आयोजित केली होती.
यावेळी अति महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
यावेळी जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळविलेले पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सुर्वे समितीचा अहवालावर चर्चा केली. अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेऊन पुन्हा सादरीकरण करून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे आमदार कुल यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅंक वॉटर क्षेत्रात नवीन बॅरेजेस बांधणेसाठी सुधारित धोरण ठरविण्याची त्यांनी मागणी केली. त्यासाठी समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे दौंड, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा परिसरातील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार असल्याने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री विखे यांनी दिल्या आहेत.
यावेळी समितीचे प्रमुख अविनाश सुर्वे, पानसे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कोपोले, जलसंपदा प्रकल्प समन्वयक संजय बेलसरे, पुणे पाटबंधारे प्रकल्पाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले. अधिकारी उपस्थित होते.





