पुणे जिल्हा : गावगाड्यासाठी हायटेक प्रचार!

नारायणगावात दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार
मंगेश रत्नाकर
नारायणगाव, – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्याने चांगलाच रंगू लागला आहे. बदलत्या वातावरणातही प्रचाराचा ज्वर तापला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वापरली जाणारी हायटेक प्रचार यंत्रणा गावपातळीवर राबविली जात आहे. यात गीते, ऑडिओ, व्हिडीओ, व्हॉट्सऍप इमेजद्वारे उमेदवाराचा आवाज मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहेत. हा प्रचार मतदारांपेक्षा इतरांचेच मनोरंजन करीत आहे.
नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील रंगत वाढली असून मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा वेग वाढला आहे. श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल व श्री मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळी नऊ वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत मतदारांच्या भेटीसाठी घेण्याचे काम सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठमोठे होर्डिंग, प्रचारासाठी चार चाकी वाहने, सोसायट्यांमध्ये सभा, जेवणावळी, प्रत्येक वॉर्डात कार्यकर्त्यांचा फौजफाटा, समाज माध्यमांवर प्रचाराचे व्हिडिओ, चिन्ह लक्षात राहावे म्हणून चिन्हाच्या भेटवस्तूंचे वाटप करणे अशाप्रकारे प्रचारात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे.
श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल ग्रामपंचायतच्या माध्यमातून मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांवर निवडणूक लढवीत आहे तर श्री मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनल मागील पाच वर्षात नारायणगाव विकासापासून कसे दूर राहिले असे आरोप करून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहे. नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही पॅनलने जी रंगत वाढवली आहे त्यावरून निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला पॅनल कुठेही कमी पडणार नाही यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. निवडणुकीच्या काळात मतदार राजाला लक्ष्मी दर्शन झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
आपले नाणं कसे खणखणीत
आपलंच नाणं कसे खणखणीत आहे, हे तसेच केलेल्या विकासकामांचे, सांगण्यासाठी उमेदवार जिवाचे रान करीत आहेत. रोज वेगवेगळ्या व्हॉट्सऍप इमेजेस तयार करून त्या व्हॉट्सऍपवर पाठविणे, आपल्या कार्यकर्त्यांना त्यांचेच स्टेटस ठेवण्यास सांगणे, प्रचार गीत तयार करून ते मतदारांना पाठविणे, प्रचाराच्या वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप तसेच केलेल्या विकासकामांचे व्हीडोओ तयार करून मतदारांना पाठविणे अशा डिजिटल प्रचारावर भर दिला आहे.
शाश्वत विकास करू शकेल…
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांवर हायटेक प्रचाराचा किती परिणाम होतो हे निकालाच्या दिवशी दिसून येईल; परंतु आपल्या वॉर्डाचा, गावाचा जो शाश्वत विकास करू शकेल अशाच उमेदवाराला मतदार मतदान करतील. निवडणुकीत दोन्ही पॅनलला विजयाची खात्री असल्याने निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि निकालानंतर विजयोत्सोव कसा साजरा करायचा याचे नियोजन करून ठेवले आहे.
वॉर्डनिहाय मतदारांचे ग्रुप
ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणाईहे मोठ्या प्रमाणात उतरलेली असल्याने हायटेक प्रचारावर भर दिला जात आहे. त्यांनी वॉर्डनिहाय मतदारांचे ग्रुप तयार केले आहेत. एक मतदार दोन-तीन उमेदवारांच्या ग्रुपमध्ये दिसून येत आहे. प्रत्येक उमेदवार दिवसभरातील प्रचाराचे छायाचित्र, व्हिडिओ ग्रुपवर टाकतात. त्यामुळे मतदारांचे व्हॉट्सऍपही निवडणुकीच्या मॅसेजने ओसंडून वाहत आहे.





