Pune District : तहान भागविण्यासाठी करावी लागतेय तीन किलोमीटर पायपीट

भोर : भोर तालुक्यातील पश्चिम डोंगराळ भागातील डेहेण गावातील मुरा या धनगरवस्तीत मागील दहाबारा दिवसांपासून पाणीटंचाई जाणवू लागली असून जवळपास पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्यामुळे तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
तीव्र उन्हाळ्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. यातच वेळवंड खोऱ्यातील डेहण गावातील मुरा या धनगरवाडीत १५ व्यक्ती वास्तव्यास असून ५० हून अधिक पाळीव जनावरे आहेत. टंचाई भासल्याने पाण्यासाठी रोजचीच पायपीट करावी लागत आहे. मुरावस्ती या धनगरवस्तीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून आठवडाभरात डेहेण गावातही टंचाई भासणार आहे. तरी मुरावस्ती येथे पंचायत समितीमार्फत तातडीने टँकरने पाणीपुरवठा करुन महिलांसह मुलाबाळांची पायपीट थांबवावी, अशी मागणी माजी सरपंच संदीप दूरकर यांनी केली आहे.
धनगर वस्तीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील विहिरीवर जनावरे घेऊन पाणी पाजावे लागते तसेच पिण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन उन्हातान्हात डोंगराची चढण चढून पाणी आणावे लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात आम्हाला कामधंदा सोडून पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शासनाने आमच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मार्गी लावावा तसेच टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा.
– धोंडिबा विठ्ठल शिंदे, ग्रामस्थ, डेहेण (ता.भोर)





