Pune District: हरियाणा केसरीला महाराष्ट्र केसरी भारी

वडापुरी : इंदापूर तालुक्यात गावोगावी यात्रा- जत्रांच्या हंगामाला उत्साहात सुरुवात झाली आहे. गावोगावच्या ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रांचा हंगाम सालाबादप्रमाणे सुरू झाला असून यात्रेच्या हंगामातील प्रमुख आकर्षण असलेले कुस्त्यांचे आखाडे आता चांगलेच रंगू लागले आहेत.
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील शेख फरीद साहेब (पिर साहेब) यात्रा नुकतीच शांततेत पार पडली. संदल, छबिना, लोकनाट्य तमाशा नंतर 22 मार्च रोजी जंगी कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध हरियाणा केसरी रवी शर्मा यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये सिकंदर शेख यांनी रवी शर्मा यांना चितपट केले.
दुसर्या इनामासाठी संग्राम साळुंखे विरुद्ध सतपाल सोनटक्के यांच्यात अटीतटीची लढत झाली. कुस्ती आखाड्यात शंभर रुपयांपासून तीन लाख रुपये इनामापर्यंत कुस्ती लावण्यात आली. इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या ग्रामदैवतांच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व देतो. यात्रेसाठी वर्गणी गोळा करणे, तमाशा मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवणे, कुस्त्यांच्या आखाड्याचे नियोजन करणे, नामांकित पैलवानांच्या कुस्त्या याकडे यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने विशेष लक्ष दिले जाते.
शेख फरीद साहेब यांच्या यात्रेनिमित्तान भाटनिमगाव व परिसरातील ग्रामस्थ मंडळी छबिन्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पीरसाहेब यांच्या दर्ग्यावर गावातील इतरही मंदिरांवर विद्युत रोषणाई करून शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. नंतर मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सिकंदर शेख यांना इनामासह मानाची चांदीची गदा देण्यात आली. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, ग्रामस्थ व इंदापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.





