पुणे जिल्हा : कडाक्याची थंडी रब्बीसाठी ठरणार पोषक

पुरंदर तालुक्यातील शेतक-यांना आशा पल्लवित
वाल्हे – यावर्षीही मान्सूनपूर्व, मान्सून पाऊसाने पुरंदर तालुक्यात दडी मारल्याने, तसेच परतीचा पाऊस पडला नाही तर, रब्बी हंगामातील पिकांना पाणी देताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाऊस अतिअल्प पडला असल्याने यावर्षी रब्बी हंगामातील पिकांना पोषक थंडी पडले की नाही ? याबाबत धास्ती शेतकरीवर्गाला वाटत होती.
मात्र, आता पिकांना लाभदायक असलेली थंडीस सुरूवात झाल्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, मका आदी पिके सुस्थितीत येतील अशी आशा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, मागील आठवड्यापासून, अचानक वाढलेली थंडी रब्बी पिकांना फायद्याची ठरत आहे.
मागील आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीचा सरासरी पारा घटत आहे. गार वार्यामुळे पुरंदर तालुक्यात गारठला वाढला असून,वाढलेल्या थंडीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका या रब्बीच्या पिकांना चांगलाच फायदा होत आहे.पहाटेपासूनच वातावरणात असलेली कडाक्याची थंडी आणि दिवसभर उन्हामध्येही गारव्याची झुळूक यामुळे हुडहुडी भरत आहे.
याचा रब्बी पिकांना या थंडीचा मोठा फायदा होईल,यात प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांची वाढ जोमाने होऊन, त्यामधील दाणेे परिपक्व होण्यासाठी मदत होईल. इतर पिकांमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना काही पिकांमध्ये मात्र चार पैसे शेतकर्यांना मिळतील, अशी आशा शेतकरीवर्गाला आहे.
थंडीचा फळ, फुल उत्पादकांना फटका.
थंडीचा कडाका मागील काही दिवसांपासून वाढला असून,यामुळे मात्र,फळबागांनासह,फुल उत्पादकांना याचा फटका बसत आहे. पुरंदर तालुक्यात अंजीराचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर घेतले जाते. मात्र,थंडीचा कडाका वाढल्याने, अंजीर ‘ऊकलत’ असून, यामुळे ऊकलेले अंजीर कवडीमोल बाजारभावात विकावे लागत असल्याने, अंजीर उत्पादक शेतकर्यांस आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच फूल उत्पादकांनाही थंडीचा फटका बसत असून फुले उमलण्याच्या प्रमाणात घट झाली असल्याने फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.





