Pune District : पावसाच्या उघडीपीमुळे भुईमुगाची काढणीची कामे सुरू

– शेंगांना मोड आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
लाखणगाव – आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू झाली असून उन्हाळी भुईमुगाच्या शेंगांना ५० ते ५५ रुपये किलो चांगला बाजार भाव आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भुईमुगाच्या शेंगा खराब झाल्या व काही शेंगांना मोड आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.
आंबेगाव तालुक्यातील मंचर,घोडेगाव,कळंब,अवसरी,पारगाव,काठापुर,जारकरवाडी, लाखणगाव,देवगाव, पोंदेवाडी आदि गावांमध्ये शेतकरी उन्हाळ्यामध्ये भुईमूग पिकाची लागवड करत असतो.या भुईमुगाची काढणी जून महिन्यात सुरू होते. आषाढी एकादशीमुळे त्याच प्रमाणे पावसामुळे भुईमुगाच्या शेंगांना ग्राहकांकडून चांगल्या प्रकारची मागणी असते. परिणामी यावेळेस हमखास भुईमूगाच्या शेंगांना बाजारभाव मिळत असतो.
त्यामुळे उन्हाळ्यात शेतकरी पाण्याची उपलब्धता असणाऱ्या ठिकाणी भुईमूग पिकाची लागवड करत असतात. तसेच उन्हाळ्यात लागवड केलेल्या भुईमुगाचे उत्पन्नही चांगले होत असल्याने व चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे. याही वर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात भुईमूग पिकाची लागवड केली होती. या भुईमुगाची काढणी सध्या सुरू झाली असून चांगला बाजार भाव मिळत आहे. सध्या भुईमूगाच्या शेंगांना ५० ते ५५ रुपये प्रति किलो, असा बाजार भाव मिळत आहे. परंतु यावर्षी मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अजून सुरूच आहे. त्याचा फटका भुईमुगाच्या शेंगांनाही झाला.
भुईमुगाच्या शेंगा या पावसामुळे सडून गेल्या आहेत. भुईमूग उपटताना या शेंगा शेतातच राहतात. परिणामी या भुईमूगापासून मिळणाऱ्या उत्पन्नातही घट झाली आहे. त्याचप्रमाणे सध्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने अनेक भुईमुगाच्या शेंगांना मोड आले आहेत. सध्या ओल असल्याने काढणीसही त्रास होत आहे. त्यामुळे मजुरीचा खर्चही वाढला आहे. परंतु अशाही परिस्थितीत भुईमुगाच्या शेंगांना अजून मोड येऊ नयेत म्हणून शेतकरी भुईमुग काढणी करत आहे.
सध्या भुईमूगाच्या शेंगांना चांगला बाजारभाव मिळत असला तरीही पावसामुळे बसलेला फटका व सध्या मोठ्या प्रमाणावर लागणारे मजूर यामुळे मात्र, शेतकऱ्यांच्या हातात म्हणावा तेवढा नफा येत नसल्याचे काठापूर चे शेतकरी पांडुरंग करंडे म्हणाले.
कोट : काठापूर बुद्रुक येथील माझ्या शेतात भुईमूग काढणी सुरू असून पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने शेतात गाळ झाला आहे. भुईमुग पीक काढण्यासाठी जास्त मजूर लागत असल्याने मजुरी खर्च वाढल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या भुईमुगाच्या शेंगांना चांगला बाजार भाव मिळत असला तरी निघणारे उत्पन्न.होणारा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हातात काहीही राहत नसल्याचे दिसून येत आहे.
-नवनाथ करंडे, शेतकरी, भोकरवाडी काठापूर.





