Pune District : ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन

शेलपिंपळगाव : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 9) राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन केले. अखिल भारतीय सरपंच परिषद याप्रकरणी आक्रमक झाली आहे. परिषदेच्यावतीने संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून काम बंद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी खेड तालुक्याच्या दौंडकरवाडी येथे त्यांना श्रध्दांजली वाहिली.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने खेड तालुक्यातील बहुळ ग्रामपंचायतीचे काम बंद करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली जिल्ह्यात गुरुवारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व ग्रामपंचायत बंद ठेवण्यात आल्या.
यावेळी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सरपंचासाठी वेगळा संरक्षण कायदा राज्य सरकारने करावा अशी मागणी सरपंच शरद मोहिते, सरपंच दौलत मोरे, सरपंच सीताराम गुजर व खेड तालुक्यातील सरपंचांनी केली आहे.
संरक्षण कायदा लागू करा
संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी झाली पाहिजे, देशमुख कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत समाविष्ट करावे, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्या करत काम बंद आंदोलन सुरू केल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी दिली.





