Pune District : शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष

– अॅड. बाळासाहेब बाणखेले यांची खंत
मंचर – शेतकरी ,कष्टकरी, मजूर यांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना लागू केल्या असल्या तरी त्याचा प्रचार प्रसार नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा फायदा होत नाही. यासाठी सेवाभावी संस्था किंवा इतर सामाजिक संस्थांची मदत शासनाने घेऊन जनजागृती चळवळ उभी करावी, असे आवाहन ज्येष्ठ कामगार नेते अॅड. बाळासाहेब बाणखेले यांनी केले.
चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली. सभेमध्ये १०० सभासद उपस्थित होते. संघाचा वर्षभरातील कामकाज व उपक्रमाचा अहवाल सादर करण्यात आला.संघाचा ऑडिट नफा-तोटा पत्रक व ताळेबंद एकमताने मंजूर करण्यात आले.सभेस संस्थेचे संस्थापक यशवंत इंदोरे, माजी अध्यक्ष कोंडाजी इंदोरे महाराज,ज्ञानेश्वर बांगर, गोविंद पोखरकर,रविकिरण डोंगरे व कार्यकारी मंडळ उपस्थित होते.
मंचरचे सुपुत्र व कामगारांसाठी आयुष्यभर झटणारे कामगार नेते बाळासाहेब बाणखेले यांचा सत्कार करण्यात आला. सभेस फेस्कामचे राज्यस्तरीय पदाधिकारी सखाराम भालेराव आणि तालुका समन्वय समिती अध्यक्ष दशरथ भालेराव यांनी मार्गदर्शन केले.अहवाल संस्थेचे खजिनदार धोंडीभाऊ सदाशिव दाभाडे यांनी सादर केला.आभार संस्थेचे सहसचिव एकनाथ इंदोरे यांनी मानले.





