पुणे जिल्हा : “सभासदांच्या दारात जा, खरे काय ते कळेल”

पृथ्वीराज जाचक यांचे छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाला आव्हान
भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरचे मुदत संपलेले अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना आपल्या कार्यकर्तृत्वाची एवढी खात्री असेल, तर हेच संचालक मंडळ निवडणूकीसाठी उभे करुन सभासदांच्या दारात जा, म्हणजे खरे काय ते कळेल. असा इशारा साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिला आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी मतदार यादी प्रक्रीया चालू केल्यानंतर त्यावर हरकती व आक्षेप कायद्यानुसार घेता येतात व त्यानुसारच आम्ही त्यांच्या लेखी पत्रावरुन सुनावणीला हजर राहीलो व आमचे म्हणणे मांडले मात्र कारखान्याने केलेल्या अदभुत जादूमुळे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी चुकीचा निकाल दिला. या निकालास उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. हा आदेश कोणाकडून तरी समजून घ्यावा. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिलेल्या निकालामुळे त्यांच्याबद्दल साखर संकूलमध्ये एक वेगळी चर्चा चालू आहे असे समजते.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना सूचना करणेबाबत आपण वरिष्ठांना पत्र दिले होते व त्यानुसार विधानभवनामध्ये विद्यमान सहकारमंत्र्यांनी मिटींग आयोजित केली होती ती अचानक रद्द का करण्यात आली? हे पत्र उच्च न्यायालय येथे दाखल केलेले असून याच्या होणाऱ्या दूरगामी कायदेशिर परिणामास आपण जबाबदार असाल याची नोंद ठेवा.
सहकार क्षेत्रात मी केलेले काम व सन 2003 या सालापासून चाललेला सावळागोंधळ सभासदांच्या लक्षात आला असून मताचा अधिकार नसल्याने कोणीही तुमच्या भुलथापांना बळी पडलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी. पोटनियमानुसार मताचा अधिकार न मिळालेले शेकडो सभासद मला फोनवरून संभाषण करतात व सर्व सभासद सुज्ञ आहेत त्यामुळे गैरसमज पसरवण्याचा तुमचा मनसुभा धुळीस मिळालेला आहे. हीच तळमळ ऊसाचा भाव देताना दाखविली असती तर बरे झाले असते. असाही आरोप जाचक यांनी केला आहे.
मुदत संपलेली सभासदांची रुपांतरीत ठेव रुपये एक कोटी साठ लाख, कामगारांचे ग्रेच्यूटी, प्रोव्हीडंड फंड आज अखेर आपण देऊ शकत नाही ही कारखान्याची आर्थिक परीस्थिती आहे. पुढील पाच वर्षात आपणच अध्यक्ष होणार आहात असा डंका आपण पिटताय पण श्री छत्रपती कारखान्याचे यंदाचे अध्यक्षपद सत्तारुढ पक्षाने विशेष राखीव केले आहे. अशी सभासदांमध्ये चर्चा आहे.
अट्टाहास कशासाठी
कारखान्याचे कार्यकारी संचालक बेकायदेशिर यादी दिल्यामुळे सध्या ऑफीसमध्ये येत नाहीत; मात्र त्यांच्या बंगल्यास बाहेरून कुलूप लावून आत बसून ते कारभार बघतायेत असे समजते. अशा पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकारी संचालकाला राजीनामा घेऊन पदमुक्त केले पाहिजे; मात्र तसे न करता हेच कार्यकारी संचालक पाहिजेत हा अट्टाहास चेअरमन व ठराविक संचालकांचा कशासाठी आहे? असा आरोप पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे.





