पुणे जिल्हा : घोड धरण 100 टक्के भरले

निमोणे – शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या 10 दरवाजांतून घोडनदीपात्रात 5500 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच घोड धरणाच्या उजव्या कालव्यातून 80 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अजय वाघ यांनी दिली.
घोड धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 7638 दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा 5467 दशलक्ष घनफूट आणि मृत पाणीसाठा 2172 दशलक्ष घनफूट आहे. धरणाला दोन कालवे असून उजव्या कालव्याची लांबी 30 किमी आणि डाव्या कालव्याची लांबी 84 किमी आहे. घोड धरणातून रांजणगाव औद्योगिक वसाहत, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, तसेच शिरुर, काष्टी व श्रीगोंदा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीद्वारे पाणी नेलेले आहे.
शिरुर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यातील मिळून तब्बल 20 हजार 500 हेक्टर क्षेत्र या धरणामुळे सिंचनाखाली आले असुन शेतीसाठी 145.8 दलघमी इतक्या पाण्याचा वापर केला जातो. धरणाच्या खालच्या बाजुस शिरसगांव काटा, धनगरवाडी, इनामगांव, नलगेमळा, गांधले मळा, तांदळी खोरे, तांदळी संगम येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असुन घोड धरणाच्या पाण्यामुळे या बंधाऱ्याना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. सध्या घोड धरण 100 टक्के भरल्याने शेतकरी आनंदित
झाले आहेत.





