वाघोली : न्हावी सांडस येथील नदी पात्रालगत असणार्या शेतकर्यांच्या कृषी पंप तोडफोड करून त्यामाद्धील तांब्याच्या तारा चोरून नेणार्या केडगाव, दौंड येथील टोळीला लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून तांब्याच्या तारा हस्तगत केल्या आहेत. अधिक चौकशीमध्ये या टोळीने इलेक्ट्रिक डीपी तांब्याच्या तारा चोरल्याचे 7 गुन्हे उघडकीस पोलिसांनी आणले आहेत.
न्हावी सांडस येथील भीमा नदी काठी शेतकर्यांनी लावलेल्या कृषी पंपांची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरून नेल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपास करीत असताना लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे दौंड तालुक्यातील केडगाव येथे सापळा लावून महेश लक्ष्मण धुमाळ (वय 29) यास ताब्यात घेण्यात आले.
चौकशीमध्ये हा गुन्हा साथीदार सोमनाथ लक्ष्मण जाधव (वय 27), तुषार संदिप काळे (वय 28), प्रथमेश बाळासाहेब जाधव (वय 18), शशिकांत शंकर कदम (वय 25) यांच्या मदतीने केल्याचे सांगितले.सर्वांना पोलिसांनी अटक केली असून चोरीचा माल घेणारा भंगार विक्रेता नासिर अहमद खान (वय 35, रा. रा. न्हावी सांडस फाटा यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी 27 हजार 500 रुपयांच्या तांब्याच्या तारा हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी अधिक तपास केला असता पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस, डोंगरगाव, बुर्केगाव, अष्टापूर, कोलवडी परीसरातील इलेक्ट्रिक डीपी मधील तांब्याच्या तारा चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.