नगर महामार्गावर अशोक पवारांच्या वाढदिवशी फ्लेक्सबाजी लक्ष्मण गव्हाणे कोरेगाव भीमा – शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा झाला. आमदारांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी पवारांना खुश करण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर भावी मंत्री असा उल्लेख असलेले होर्डिंग्ज लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने भावी मंत्र्यांच्या या बॅनरची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसाचे बॅनर पुणे- नगर महामार्गावर अनेक ठिकाणी झळकले आहेत. याची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. आमदार अशोक पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वाढदिवशी अनावश्यक खर्च टाळावा, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. परंतु आपल्या नेत्यावरील प्रेम दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी फक्त वाढदिवसाच्याच नव्हे तर आगामी विधानसभेसोबतच भावी मंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्याने दस्तुरखुद्द शरद पवारांनी अशोक पवारांना मंत्री करणार असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच एका जाहीर सभेत सांगितले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना देखील आपल्या भावनांना आवर घालता आला नसल्याचे यावेळी भावी मंत्री उल्लेख असलेल्या फ्लेक्समुळे दिसून आले आहे. एकीकडे लोकसभेच्या प्रचारा वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशोक पवार यांना खुले आव्हान दिल्यानंतर शिरूर हवेली मधील जनता अशोक पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याचे लोकसभा निकालानंतर दिसले. शरद पवारांन बाबत ची सहानुभूती, अशोक पवारांच्या विकासाचा धडाका या मुद्द्यांवर लोकसभा निवडणूक पार पडली आगामी निवडणूक होई पर्यंत महाराष्ट्रात अशीच पवारांची सहानुभूती राहिली तर अशोक पवारांच्या रूपाने अनेक वर्षांनंतर शिरूर तालुक्याला मंत्रिपद मिळू शकत असल्याने शिरूर हवेली मधील जनता अशोक पवारांना कौल देते की काय हे मात्र आगामी निवडणुका मध्येच समजणार आहे. आमदार अशोक पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहत आपला प्रामाणिकपणा दाखवत निष्ठा जपली. टोकाची टीका व त्रास सहन केला. पण आपली निष्ठा सोडली नाही, याची दखल शिरूर- हवेलीतील जनतेने घेऊन महाराष्ट्राचे भावी मंत्री म्हणून आमदार पवारांना शुभेच्छा देत त्यांचे वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद सन्मान केले आहे. हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे आहे. – पंडित दरेकर, माजी सदस्य, जिल्हा नियोजन समिती.