मंचर : नारोडी (ता आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री मुक्तादेवी मंदिर जिर्णोद्धार परिसर सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपयांचा निधी शासनाच्या वतीने देण्याची घोषणा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

ग्रामदैवत श्री मुक्तादेवी मंदिर जिर्णोद्धार पहिला कलशारोपण वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवीच्या मुखवट्याची सजवलेल्या रथातून कलाशाधरी महिला, वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात व पारंपरिक लेझिम पथक यांच्या उपस्थितीत ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली. तब्बल तीन तास ही मिरवणूक चालली होती.

मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी अभिषेक प्रसाद काळे यांच्या हस्ते पार पडला. मांडव डहाळे, संगीत भजन, हरिपाठ, महाआरती घेण्यात आली. सायंकाळी केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन झाले.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. नारायण पाटील हुले यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बंगाळ, सचिव गणेश वाघमारे, उपाध्यक्ष गणेश हुले, ज्ञानेश्वर नाईक व संचालक मंडळ यांनी मान्यवरांचा सत्कार केला. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर व मुक्ताई या भावंडांनी वास्तव्य केले होते व मुक्ताबाईने या ठिकाणी कीर्तन केले होते, अशी आख्यायिका आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून संपूर्ण संगमरवर दगडातील हे मंदिर उभे केले आहे.

यासाठी अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत. ग्रामस्थांसाठी पुरणपोळी, आमरस या अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वळसे पाटील मंदिरासाठी स्वतः एक लाख रुपयाची देणगी दिली. तसेच याला तीर्थक्षेत्राचा दर्जा शासनाकडून मिळून देऊ, येथील परिसर सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपयाचा निधी देण्याची घोषणा केली.