Pune District : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत हेल्पलाइन

पिरंगुट : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत समुपदेशन करण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने मोफत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेवून संस्थेतील समुपदेशकांकडून शंकाचे निरसन करावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड.संदीप कदम यांनी केले आहे.
याबाबत ॲड. कदम म्हणाले की, बारावीची परीक्षा दि. 11 फेब्रुवारी आणि दहावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारीला सुरू होत आहे. परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर करण्यासाठी, निकोप व आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, यासाठी उपमुख्यमंत्री, संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १३ वर्षापासून संस्थेत स्वतंत्र मोफत हेल्पलाइन सुरू केली.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा व्यवसाय मार्गदर्शन पदविका हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले संस्थेत चौदा समुपदेशक आहेत. समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्षभर विविध प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. हेल्पलाइनद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी राज्यातील ही एकमेव संस्था आहे.
यावेळी संस्थेचे खजिनदार ॲड. मोहन देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





