पुणे जिल्हा : सत्ताधारी राज्य कोणासाठी चालवतात

शरद पवार : बारामतीत युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता
बारामती – सत्ताधार्यांनी आज राज्यात महिला मुलींसाठी लाडकी बहिण योजना जाहिर केली. पण त्या सुरक्षित नाहीत. आज तरुणांना शिक्षण घेवून देखील तरुणांना रोजगार नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतकर्यांची अवस्था वाईट केली. मग सत्ताधारी राज्य कोणासाठी चालवतात, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
बारामती येथे महायुतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, लाडकी बहीण योजना जाहिर केली. महिला, मुलींचा जरुर सन्मान करा, पण आज राज्यात या बहिणींची काय अवस्था आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अत्याचारीत मुली आणि महिलांची संख्या ६७ हजार ३८१ वर पोहोचली आहे. ६४ हजार मुली बेपत्ता आहेत. त्यांच्यासाठी सत्ताधार्यांनी कोणती पावले टाकली, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
पवार म्हणाले की, राज्यात शेतीमालाला भाव नाही. शेतीमालाची निर्यातबंदी केली. २० हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकर्यांचा काय गुन्हा होता. शेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकर्यांवर ही वेळ आल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. देशातील उद्योजकांचे १६ हजार कोटींची केंद्र सरकारने कर्जमाफी केली. मात्र, शेतकर्यांवर कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करण्याची वेळ आल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, डाॅ. अमोल कोल्हे, युगेंद्र पवार, उत्तम जानकर, सक्षणा सलगर यांची भाषणे झाली. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, प्रतिभा पवार, श्रीनिवास पवार, पृथ्वीराज जाचक, शर्मिला पवार, रेवती सुळे, जगन्नाथ शेवाळे आदी उपस्थित होते.
बारामती येथील सांगता सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी घेतलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय ‘कराल काय नाद परत, बापमाणूस, असे शरद पवार यांचे वर्णन करणाऱ्या फलकांनी सभेत अनेकांचे लक्ष वेधले.
महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला
पवार म्हणाले की, आज राज्यात मुले- मुलींनी शिक्षण घेतले आहे. पण त्यांना नोकऱ्या नसल्याने ते निराश आहेत. या निराशेतून ही मुले टोकाचे पाऊल उचलण्याची भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली. बारामतीकरांमुळे मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी सुरु करुन मोठे उद्योग आणले. हजारो हातांना काम दिले. मात्र, आज सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेले. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ते केवळ गुजरातचे नाहीत. देशाचा विचार न करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची का, याचा विचार करा, असा टोला पवार यांनी लगावला.
मोदींना महाराष्ट्र काय चीज आहे, हे दाखवले
पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ४०० खासदार निवडून देण्याची भूमिका मांडत होते. देश चालविण्यासाठी २५० ते ३०० खासदार पुरेसे असतात. मात्र, त्यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेले संविधान हटवायचे होते. घटनेत बदल करण्यासाठीच त्यांना एवढे खासदार निवडून आणायचे होते, असा आरोप त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. मात्र, महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून देवून मोंदींना महाराष्ट्र काय ‘चीज’ आहे ,ते दाखवून दिल्याचे शरद पवार म्हणाले.





