पुणे जिल्हा : तुकोबांच्या पालखीवर फुलांची उधळण

दौंडमध्ये जंगी स्वागत : आज यवत मुक्कामी
मनोज खंडाळे
यवत – जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवार (दि.३) हवेली तालुक्यातून दौंड तालुक्यात प्रवेश केला. यावेळी पुणे- सोलापूर महामार्गवरील पालखी मार्गातील सर्वात मोठा ३१ किलोमीटरचा पल्ला पार करून यवत (ता. दौंड) येथील काळभैरवनाथ मंदिरात तुकोबाचा पालखी सोहळा विसावला.
जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचा हवेली तालुक्यात लोणी काळभोर येथे मुक्काम असतो. पालखी उरुळी कांचन याठिकाणी विसाव्यासाठी थांबते. मात्र, उरुळी कांचन येथे पालखी सोहळ्याने विसावा न घेता सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी दौंड तालुक्यात प्रवेश केला. यावेळी दौंड तालुक्यातील नागरिकांनी, ग्रामपंचायत बोरिभडकयांच्या वतीने फुलांचा वर्षाव करीत सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार रंजना कुल, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिकारी संजय जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव, दौंडचे प्रांताधिकारी मीनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, महावितरणचे अधिकारी, माजी उपसभापती नितीन दोरगे, युवा नेते गणेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, ग्रामस्थ, पदाधिकारी, शासकीय कर्मचारी व यवत ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त व्यावसायिक, उद्योजक यांच्यातर्फे पालखी सोबत असणाऱ्या वारकरी आणि भाविकांना जेवण, फराळ, नाष्टा, चहा, केळी, बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. सोहळ्यासोबत लाखो वारकरी यांच्यामुळे भक्तीचा मळा वारकऱ्यांमध्ये फुललेला होता. अभंगाच्या ओळी, कपाळी केशरी गंध, गळ्यामधी तुळशी माळा, भगव्या पताका घेऊन पायी चालत अखंड माऊली तुकोबारायांच्या नामाचा जप अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीचा ग्रामीण भागातील पहिला मुक्काम यवत या ठिकाणी विसावला. टाळ- मृदंगाच्या गजरात मंत्रमुग्ध होत लाखो वारकऱ्यांसोबत पालखी सोहळा यवत येथील कालभैरवनाथ मंदिरात मुक्कामासाठी विसावला.
यावेळी विविध सामाजिक संघटना, संस्था, उद्योजक, कार्यकर्ते यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर फुलांचा वर्षाव करीत संत तुकोबारायांच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. पालखी पुढे असणाऱ्या अश्वाचे दर्शन घेऊन रथामध्ये ठेवलेला पादुकांचे दर्शन दुरून मिळाले तरी भाग्य लाभल्याचे वारकरी व भाविक मनोमन आनंदी होत आहेत. भक्तिमय वातावरणात वारकरी टाळ- मृदंगाच्या तालावर, अभंगांच्या ओव्यांवर धुंद होऊन नाचत होते.
यावेळी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. रात्री ९.३० वाजता आरती झाली. रात्री जागर व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मोबाइल चार्जिंग पॉईंट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आंघोळीचा पाण्याची व्यवस्था, आदी व्यवस्था केलेल्या आहे. वारकऱ्यांची पुरेपूर दक्षता प्रशासनाकडून घेतली आहे.
१००० किलो पिठलं, १ लाख भाकरीचा बेत
यवत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मिळून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वारकऱ्यांच्या जेवणासाठी जवळपास १ हजार किलोचे पिठलं आणि एक लाखांच्या आसपास भाकरीचा बेत केला आहे. यावेळी यवतमधील प्रत्येक नागरिक आपल्या इच्छेने भाजी आणि भाकरी या वारकऱ्यांसाठी श्री काळभैरवनाथ मंदिरात आणून देत असतात. ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आजही यवतकर जोपासत आहेत. गावकऱ्यांकडून वैष्णवांचे आदरांतिथ्य केले जात आहे.





