पुणे जिल्हा : कंद यांच्या निर्धार मेळाव्यात फटाके फुटणार ?

पेरणे फाटा येथे मेळाव्याकडे लक्ष : भाजपाची गोची
तेजस फडके
निमोणे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या शिरुर-हवेली मतदारसंघात ऐन थंडीतही राजकीय वातावरण गरम झाले असून विधानसभेसाठी भाजपाकडून प्रदीप कंद इच्छुक होते. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक होते. कटके यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कंद यांचे समर्थक नाराज झाले असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
प्रदीप कंद यांनी रविवार (दि २७) पेरणे फाटा (ता. हवेली) येथे निर्धार मेळावा आयोजित केला असून मेळाव्यात दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटण्याची शक्यता असून निर्धार मेळाव्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. माऊली कटके यांनी आयत्या वेळेस महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने कंद यांची गोची झाली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेत विधानसभा निवडणुकीसाठी कोणताही उमेदवार आयात करु नये. त्यापेक्षा आमच्यातील कोणालाही उमेदवारी द्यावी अशा आशयाचे पत्र अजित पवार यांना दिले होते. परंतु तरीही माऊली कटके यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्यांना महायुतीकडुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार?
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु लोकसभेला शिरुरचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला सुटल्यानंतर आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेची निवडणुक लढवली. परंतु शिरुर लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी मतदारांना ही गोष्ट न पटल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना भरघोस मतांनी निवडुन दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उद्धव ठाकरेंची साथ सोडून अजित पवार गटात गेलेल्या माऊली कटकेंना डावलून शिरुर-हवेलीची स्वाभिमानी जनता संघर्षाच्या काळात शरद पवारांसोबत ठामपणे उभ्या राहणाऱ्या अशोक पवारांना साथ देऊन लोकसभेची पुनरावृत्ती करुन इतिहास घडविणार का, हे दि. २३ रोजी मतपेटीतून दिसणार आहे.





