Pune District : शिरोलीत शॉर्टसर्कीटने आग; घर भस्मसात

राजगुरूनगर : पुणे-नाशिक महामार्गावरील शिरोली गावातील विकासनगरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अशोक महादु केदारी यांच्या घराला आग लागली. गल्लीबोळामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी आल्याने आगीत मोठे नुकसान झाले अहे.
शिरोली येथील अशोक केदारी यांच्या घराला सोमवारी (दि.24) रात्री 9 च्या सुमारास आग लागली. गावठाण हद्दीत जाणार्या रस्त्यावर स्थानिकांनी घरासमोर अतिक्रमणे केल्याने अरुंद रस्त्यामुळे घटनास्थळी पाण्याचा टँकर वेळेत जाऊ शकला नाही. उपलब्ध पाण्याच्या सहाय्याने स्थानिकांनी पाण्याचे पाइप लावुन आगीवर नियंत्रण मिळवले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घरातील साहित्याचे मात्र नुकसान झाले. शिरोलीमधील विकासनगरकडे जाणार्या रस्त्यावर आलेली अतिक्रमणे काढण्याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीला पत्र व्यवहार निवेदने दिली. तहसीलदार यांच्याकडे महिलांनी निवेदन देऊन अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली; मात्र या मागणीकडे प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले होते.
सोमवारी लागलेल्या आगीची घटनेला प्रशासन जबाबदार आहे. त्यांनी वेळीच अतिक्रमण हटवले असते तर संबंधित व्यक्तीच्या घराचे नुकसान झाले नसते, असे नागरिकांनी सांगितले.





