Pune District :भुलेश्वर घाटात दरड कोसळण्याची भीती

दरडींचे दगड, गोटे रस्त्याच्या बाजूला असलेल्या चार्यांमध्ये पडून
वाघापूर – यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने भुलेश्वर मंदिर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने घाटातील सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक मंदिर पाहण्यासाठी व घाटात फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, घाटातील वळणावर असलेली धोकादायक झाडे, अनेक ठिकाणच्या धोकादायक दरडी व घाटातील रस्त्याच्या बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी चारीमध्ये कोसळलेले दगडी यामुळे घाट रस्त्यातील प्रवास धोकादायक झाला आहे.
मंदिरातील रेखीव, कोरीव शिल्पकाम पाहण्यासाठी, तसेच पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात निसर्गाचे सौंदर्य बहारल्याने पुणे शहर, हडपसर परिसरातील शहरी वर्ग मोठ्या संख्येने मंदिर व घाट परिसरामध्ये येत आहेत. घाटातील धबधबेही अनेक वर्षानंतर मे महिन्याच्या अखेर पासूनच प्रवाहित झाल्याने यामध्ये पर्यटक आनंद लुटत आहेत. घाटातील अनेक वळणांवर, तसेच कपार्यावर, उंचावर उभे राहून पर्यटक फोटो काढताना दिसत आहेत. पावसामुळे घाटातील कड्या कपारींमध्ये पाणी गेल्याने अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वारंवार दरडी कोसळत आहेत.
घाटातील पहिल्या वळणापासून शेवटच्या वळणापर्यंत कमीत कमी 10 ते 15 ठिकाणी कोसळलेल्या दरडींचे दगड गोटे रस्त्याच्या बाजूला असलेल्या चार्यांमध्ये पडून आहेत. यामुळे पावसाचे घाटाच्या उंचावरून पडणारे पाणी चारीतून अनेक ठिकाणी रस्त्यावर येऊन रस्त्यात राडा येण्याबरोबरच मोठ्या चार्या पडल्या आहेत. यामध्ये दुचाकी चालक घसरून पडण्याची भीती तर आहेच, मात्र त्याबरोबरच चारचाकी वाहन देखील या खड्ड्यांमध्ये जाऊन दरीत कोसळण्याची भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत.
घाटात अनेक ठिकाणी वळणाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात झाडे वाढले असून, यामुळे समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे घाटातील पायथ्याला पहिल्याच वळणावर मागील सहा महिन्यांहून अधिक काळ एक झाड रस्त्याच्या बाजूला उन्मळून पडलेले तशाच अवस्थेत आहे. या झाडाला बाजूला करण्याची तस्ती ना सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी घेतात ना वन विभागाचे कर्मचारी घेतात. अपघात झाल्यानंतरच कर्मचारी जागे होणार की काय? असा संतप्त सवाल प्रवासी करत आहे.
घाटामध्ये पोलिस यंत्रणेची गरज
अनेक पर्यटक घाटातील कपारींना उभे राहून कुटुंबासह फोटो काढतात. मात्र, घाटातील या दरडी कधी कोसळतील याचा नेम नसल्याने पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी फोटो काढण्यासाठी टाळणे जीविताच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. यासाठी घाटामध्ये पोलिस सुरक्षा यंत्रणेने अधून मधून चक्कर मारणेही तितकेच गरजेचे आहे.
शहरापासून नजीक असणारे पर्यटन स्थळ म्हणून सध्या भुलेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांचा व पर्यटकांचा ओढा असल्याने त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना होणे गरजेचे आहे. शासन स्तरावर व जिल्हा परिषदेकडे माळशिरस ग्रामपंचायत सातत्याने यासाठी पाठपुरावा करत आहे.
– आरती यादव, सरपंच, माळशिरस
पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येताना आपल्या जीविताची काळजी घेत आवश्यक ते सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. धोकादायक दरडींच्या ठिकाणी जाणे प्रकर्षाने टाळावे व निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असताना कोणाचे नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेण्यात यावी.
– राजेंद्र गद्रे, माजी उपसरपंच, माळशिरस





