Pune District : राजगुरूनगर-तिन्हेवाडी रस्त्यावरील पूल कोसळण्याची भीती

राजगुरूनगर – राजगुरूनगर – तिन्हेवडी रस्त्यावर चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावर असलेल्या पुलाच्या काँक्रिटच्या (पिलर) खांबाला खाली भागदाड पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
शहराला जोडणार्या तिन्हेवाडी, अरुडेवाडी, सांडभोरवाडी आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून तिन्हेवाडी-राजगुरूनगर हा रस्ता आहे. या रस्त्यावर असलेल्या क्रीडा संकुलाजवळून चासकमान धरणाचा डावा कालवा आहे. या कालव्याला वर्षातील 200 ते 300 दिवस पाणी वाहत असते सततच वाहणार्या पाण्यामुळे या रस्त्यावरील पुलाच्या काँक्रिटच्या पिलरला धोका निर्माण झाला आहे.
पिलरचा खालचा भाग तुटण्यास सुरुवात झाली आहे, पाणी असल्याने ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही; मात्र कालव्याचे पाणी बंद झाल्याने पिलरचा खालचा भाग दिसू लागल्याने हा भयावह प्रकारसमोर आला आहे. कोणत्याही क्षणी हा पूल कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
राजगुरूनगर शहराला जोडणार्या तिन्हेवाडी, अरुडेवाडी, सांडभोरवाडी आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून या पुलावरून मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. यात विद्यार्थी आणि शेतकर्यांची संख्या मोठी असून पुलाला धोका असल्याने नागरिकांच्या जिवीतालाही धोका निर्माण झाला आहे.
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावर अनेक ठिकाणी पूल बांधले आहेत. या पुलाच्या स्लॅब आणि पिलरमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे तर अनेक पिलरचे दगड निसटल्याने पूल धोकादायक बनले आहेत. कालव्यावर अनेक ठिकाणी स्लॅबची गळती धोकेदायक झाली आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट करावे
चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावरील सर्व पुलांचे पिलर आणि स्लॅब गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. कालव्याचे पाणी गळती होत असल्याने अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणी साठत आहे. तर कालव्या खाली असलेल्या शेतकर्यांचे कालवा फुटल्याने मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कालव्यावर असलेले हे पूल आणि स्लॅब नादुरुस्त झाल्याने त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी. यासह कालव्यावरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी होत आहे.





