Pune District : वाघोली पोलीस ठाण्यासमोर उपोषण

वाघोली : येथील पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी दिलेल्या वागणुकीबाबत व महिलेवर झालेल्या अन्यायाबाबत रविवारी (दि. 26) सकाळी सहा वाजता एक महिला आमरण उपोषणाला बसणार आहे.
वाघोली येथील एका घरगुती वादातून समोरच्या व्यक्तीला समाधान मिळावे यासाठी एका महिलेला सायंकाळी तिच्या राहत्या घरातून कोणतीही नोटीस अथवा कोणता गुन्हा अथवा कोणताही अदखलपात्र गुन्हा दाखल नसताना पोलीसांनी महिलेला उचलून पोलीस ठाण्यात आणले असा आरोप त्या महिलेने केला आहे.
पोलीस उपायुक्तांकडे प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया चालू असताना देखील कोणताही वाद झाला नसताना वाघोली पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीबाबत त्रस्त महिलेने पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी करून न्याय मागितला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून मला न्याय मिळाला होता. मात्र माझ्या नातेवाईकांना पोलिसांसमोर मारहाण व शिवीगाळ होऊन देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता मलाच अपमानास्पद वागणूक दिली आहे. त्यामुळे मला न्याय मिळावा म्हणून मी आमरण उपोषण करणार आहे.
-एक त्रस्त महिला, वाघोली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुट्टीवर गेल्यानंतर काही कर्मचार्यांकडून महिलेला जाणीवपूर्वक त्रास दिला असल्याची चर्चा वाघोलीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वरिष्ठ याप्रकरणी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





