Pune District : लाखणगाव हद्दीत ऊस जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मंचर – आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी लाखणगाव हद्दीत सोमवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास शेतकरी शरद नाथा रोडे व सुभाष भाऊ रोडे यांच्या शेतातील ऊसाला अचानक आग लागली. या आगीत प्रत्येकी अंदाजे दीड एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या साखर कारखाने सुरू नसल्याने जळालेला ऊस कारखान्यात देता येईल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले.
आमचा ऊस वर्षभराच्या मेहनतीचा होता. एका रात्रीत सगळं जळून गेलं. कारखाने सुरू नसल्याने जळालेल्या ऊसाचं काय करायचं हेच कळत नाही, भरपाई तरी मिळेल का हीच चिंता आहे.
– शरद रोडे, शेतकरी





