Pune District : भीमाशंकर कारखान्यावर शेतकऱ्यांचा जल्लोष

मंचर : दत्तात्रयनगर, पारगाव (ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार” जाहीर झाल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखाना स्थळावर जल्लोष करून शेतकरी आणि उसतोडणी कामगारांनी एकमेकांना पेढे भरूवून आनंद व्यक्त केला.
वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार” भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी वर्ग व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील, मंचर बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे यांच्यासह संचालक,कारखान्याचे अधिकारी, सेवक वर्ग,शेतकरी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेला हा कारखाना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या सुरू आहे. सर्व संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने काम करत आहे. कारखान्याची जी काही प्रगती झाली आहे ती, वळसे पाटलांमुळे झाली आहे. कामगार, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांनी केलेले नियोजनामुळे यावर्षीही कारखान्याला पुरस्कार प्राप्त झाला आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जागेची कमतरता होती.
त्यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आली होती. सरकारने ३३२ एकर जागा संपादित करून दिली होती. त्यासाठी ६ कोटी ३४ लाख ३९ हजार ९२७ रुपये शासन दरबारी तिजोरीत भरले होते. मात्र, काहींनी या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. खालच्या न्यायालयापासून वरच्या न्यायालयापर्यंत केस गेल्याने सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयाने संबंधितांची याचिका फेटाळली व कारखान्याच्या बाजूने निकाल दिला.९ वर्षाच्या लढ्यानंतर कारखान्याला ३२ एकरचा भूखंड मिळाला असून ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याचे बाळासाहेब बेंडे पाटील म्हणाले.





