Pune District : शिवसृष्टीतील पावसाच्या पाण्यामुळे शेतकर्यांची शेती उद्ध्वस्त

शासनाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी
काटेवाडी – बारामती तालुक्यातील कण्हेरी येथे बांधकाम सुरू असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पातून पावसाचे पाणी सिमेंटच्या पाईपमधून बाहेर सोडले जात असल्याने शेजारच्या शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सतत येणार्या पाण्यामुळे शेतातील सुपीक माती वाहून जात असून उभ्या पिके पाण्याखाली जात आहेत. या परिस्थितीमुळे स्थानिक शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सध्या शिवसृष्टीतून तीन ते चार फुटी पाईपमधून पावसाचे पाणी बाहेर सोडले जाते. मात्र या पाण्याचा निचरा थेट शेजारील शेतात होत असल्याने शेतमालकांचे शेत नदीसारखे वाहते आहे. एकीकडे माती वाहून गेल्याने शेतीचे नुकसान, तर दुसरीकडे पाणी साचल्याने उभ्या पिकांचे नुकसान – अशी दुहेरी समस्या शेतकर्यांसमोर उभी ठाकली आहे.
आम्ही मेहनतीने उभा केलेला हंगाम पाण्याखाली गेला, आता भरपाई तरी कोण देणार? शिवसृष्टीसारखा मोठा प्रकल्प सुरू करायचा तर पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करायला हवा, आमच्या पिकांचे काय? आमच्या शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने पुढील पेरणीसाठीही जमीन कमी सुपीक राहणार आहे, हे कोण भरून काढणार? असे अनेक प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
शेतकर्यांनी सुचवलेले पर्याय
शेजारील शेतकर्यांनी प्रशासनासमोर मागणी ठेवली आहे की, शिवसृष्टीतून बाहेर पडणारे पाणी सिमेंट पाईपलाईनद्वारे थेट नीरा डाव्या कालव्यात सोडावे. यामुळे शेतीचे होणारे नुकसान थांबेल व भविष्यातील पिकांचे रक्षण होईल. शेतकर्यांचे म्हणणे आहे की, यावर तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर पुढील पावसाळ्यात आमचे आणखी मोठे नुकसान होणार आहे. शासनाने आमच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि योग्य तो निर्णय घ्यावा.





