पुणे जिल्हा : आरक्षण लढ्यात जीव गेला तरी मागे हटणार नाही

मनोज जरांगे ः मराठा समाजाने ज्यांना मोठे केले तेच विरोधात उभे
लोणीकंद – मराठ्यांच्या मुलाच्या हिताच्या लढाईत जीव गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, हा तुळापूर येथील शंभूराजांच्या शौर्यपिठावरून शब्द आहे. ज्यांना आपल्या बापजाद्यांनी मोठे केले तेच आज आपल्या विरोधात उभे राहिले. राज्यातील मराठा समाज करोडोने एकत्र आला असल्याने विरोधकांचे षडयंत्र मोडीत निघत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी श्री क्षेत्र तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्यपिठस्थळी नतमस्तक होत शंभूराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. पुणे जिल्ह्यातील झंझावाती दौरस सुरुवात केली. यावेळीआमदार ऍड. अशोक पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
जरांगे पाटील म्हणाले, रायगड व वढू-तुळापूरच्या पवित्र भूमीवर नतमस्तक होत शिवशंभू छत्रपतींचा आशीर्वाद घेत मराठा समाजावरील गेल्या 70 वर्षांतील अन्यायाविरुद्ध लढा मायबाप जनतेच्या आशीर्वादासह सुरु केला आहे. मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी लढायचं असून आपल्यावरील अन्याय बंद करायचा आहे. आपण 70 टक्के लढाई जिंकली असून महाराष्ट्रात कुणबीच्या 29 लाख नोंदी सापडल्या आहेत. 70 वर्षांपूर्वी आरक्षण असते तर जगात सर्वात प्रगत मराठा समाज झाला असता. त्यामुळे आतातरी आपल्यात मतभेद आणू नका, आरक्षण मिळेपर्यंत कोणाचही ऐकू नका आपल्या मुलाच्या हितासाठी लढायच आहे.
यावेळी तुळापुर ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने फटाके, रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून जंगी स्वागत करित जरांगे पाटिल यांचा तुळापुर ग्रामस्थांच्या वतीने शंभूराजांच्या पुर्णाकृती पुतळा भेट दिला. यावेळी फुलगाव, लोणीकंद येथेही स्वागत करण्यात आले. यावेळी लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तोच म्हणतोय, आरक्षण मिळवू देणार नाही
आपल्याला राजकारण करायचे नाही. कारण आजपर्यंत आपण खूप झेंडे उचलले, ज्यांना मोठे केले ते मागे राहायला तयार नाही. आपल्या मागे कोणी नाही हे लक्षात आले अन् ज्याला मोठा केला तोच म्हणतोय मी आरक्षण मिळवू देणार नाही. मी शांत आहे पण माझ्या वाटेला गेलात तर सोडत नाही, असा इशाराही यावेळी जरांगे यांनी दिला.





