पुणे जिल्हा : तीनवेळा पक्ष बदलूनही पदरी अपयशच!

इंदापुरचा कौल विरोधात : हर्षवर्धन पाटील यांना आत्मचिंतनाची गरज
पळसदेव : विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. पाटील यांनी या निवडणुकीत पक्ष बदलूनही त्यांना अपेक्षित यश संपादन करता आले नाही. हर्षवर्धन पाटील यांनी ऐन निवडणूक काळात महायुतीमध्ये इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्याने यंदाची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत १९ हजार ४१० मतांनी पराभव पत्करावा लागला. पाटील यांचा भरणे यांनी सलग तिसऱ्यांदा पराभव केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा ३११० मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी पाटील यांनी राज्यात भाजपची हवा आहे, हे पाहून काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी पाटील यांना १११८५० मते मिळाली होती तर भरणे यांना ११४९६० मते मिळून भरणे यांनी ३११० मताची आघाडी घेतली होती.
भाजपामध्ये प्रवेश करूनही भाजपच्या लाटेचा फायदा पाटील यांना झाला नाही. आताच्या निवडणुकीचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून पाटील यांचे मतदान घटले आहे. यावेळी २०२४ च्या निवडणुकीत पाटील यांना ९७८२६ मते मिळाली. मागील विधानसभेपेक्षा सुमारे १४ हजार मतदान घटले आहे.
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून निवडणूक लढवून ९४२२७ मते मिळवली. भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवून १०८४०० मते मिळवली. पाटील यांचा १४१७३ मतांनी पराभव केला होता. आतापर्यंत भरणे यांनी पाटील यांचा सलग तीनवेळा पराभव केला आहे.
पाटलांचा पराभव पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी
पाटील यांनी १९९५ च्या विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून गणपतराव पाटील यांचा ११ हजार मतांनी पराभव केला. यानंतर सलग चार टर्म आमदार, मंत्री म्हणून कामकाज पाहिले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी काँग्रेसमधून लढवून भरणे यांचा ७९३३ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर सलग तीन २०१४, २०१९ व २०२४ मध्ये पाटील यांच्यावर भरणे यांनी मात केली आहे. मात्र, या निवडणुकीत पाटील यांनी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, असा राजकीय प्रवास करूनही त्यांच्या पदरी अपयश आले आहे. गेल्या पंधरा वर्षांत त्यांना यश संपादन करता आले नाही. हा पराभव पाटील यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला आहे.
पंधरा वर्षांत जनमताचा कौल विरोधात
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दमदार यश मिळाले होते. यावेळी लोकसभेप्रमाणे सहानुभूतीच्या लाटेत तुतारीवर विजय मिळवणे सोपे होईल, या आशेवर पुन्हा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून जोरदार व नियोजनबद्ध प्रचार केला. मात्र, शरद पवार यांचा करिष्मा इंदापूर तालुक्यात चालला नाही. याशिवाय सलग दहा वर्ष जनतेची नाळ तुटल्याने यावेळी पुन्हा पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे.





