Pune district : पांगरीत ‘समाजवन’ मियावाकी जंगल उभारणी

गावकर्यांचा पुढाकार – 550 देशी झाडांची लागवड
राजगुरुनगर – गावाची हिरवाई वाढवून पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा उचलत पांगरी (ता. खेड) येथे ‘समाजवन’ मियावाकी जंगल उभारण्यात आले. जेएसडब्ल्यू फाउंडेशन, जेएसडब्ल्यू एमआय व मुंबई माता बाल संगोपन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रकल्पाअंतर्गत प्राथमिक शाळा – पांगरी शेजारील गायरानामध्ये सुमारे अडीच गुंठ्यांवर 125 प्रकारची 550 देशी झाडांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमास जेएसडब्ल्यू लिमिटेडचे अधिकारी सुनील शर्मा, प्रशांत आचार्य, मनीष चौधरी, महादेव शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रल्हाद घोलप, प्रफुल्ल बुटे, प्रकाश घोलप, उद्योजक गणेश शितोळे, पोलीस पाटील रवींद्र भोसले, शत्रुघ्न घोलप, गणपत गाढवे, अमोल गाढवे, मुख्याध्यापक संदीप जाधव, शाळेतील विद्यार्थी, मुंबई येथील पीसीजीटी जनजागृती विद्यार्थी संघ, तसेच संस्थेचे समन्वयक सुरज गौतम, शर्मिला सांडभोर, स्वाती शिंदे, श्वेता गायकवाड, अशोक मांजरे, प्रशांत पारधी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा प्रकल्प ग्रामस्थ, विद्यार्थी व संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून उभा राहिला आहे. विशेष म्हणजे येथे केवळ देशी व स्थानिक झाडांची लागवड करण्यात आली असून, जैवविविधतेचे संरक्षण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे पांगरी गावात एक लहान जंगल तयार होऊन गावाची शान वाढणार असून पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागणार आहे.
आजच्या काळात झपाट्याने वाढणारे शहरीकरण, औद्योगिकीकरण व प्रदूषणामुळे हरित क्षेत्राचा र्हास होत आहे. याचा परिणाम हवामान बदल, पाणीटंचाई व जैवविविधतेवर होत आहे. अशा परिस्थितीत पांगरी ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकार केवळ झाडे लावण्यापुरता मर्यादित नसून गावकर्यांच्या सहभागातून हरित क्रांती उभारण्याचा शाश्वत प्रयत्न आहे.
या उपक्रमामुळे पांगरी गाव हरित व शाश्वत भविष्याच्या दिशेने पुढे जात असून, पर्यावरण संवर्धनासाठी अनुकरणीय ठरत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सुर्वे यांनी केले, तर मुख्याध्यापक संदीप जाधव यांनी आभार मानले.
मियावाकी पद्धतीचे फायदे
जपानी पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अकीरा मियावाकी यांनी विकसित केलेली ही शास्त्रीय पद्धत आहे.
स्थानिक जातींच्या झाडांची दाट लागवड केली जाते.
2-3 वर्षांत झाडे जोमाने वाढतात.
25-30 वर्षांत तयार होणारे जंगल अवघ्या 10 वर्षांत उभे राहते.
कार्बन शोषण, प्रदूषण नियंत्रण, ऑक्सिजन पुरवठा, जमिनीची धूप रोखणे, भूजलसाठा वाढविणे या सर्व बाबतीत ही पद्धत प्रभावी ठरते.
पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो.





