पुणे जिल्हा : ग्रामीण भागात कॅफे संस्कृतीचा शिरकाव

ठराविक कॅफेत अश्लील चाळ्यांचा बाजार : पोलिसांचे दुर्लक्ष
शेरखान शेख
शिक्रापूर – सध्या पुणे जिल्ह्यातील पोर्शे कार व हिट अँड रण प्रकरणामुळे पब चांगलेच चर्चेत आले असून या पबमुळे युवा पिढी व्यसनाधीन झाल्याचे आणि पबमुळे त्यांच्या व्यसनाला आसरा मिळत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागातील पब व ग्रामीण भागातील ठराविक कॅफे युवक व युवतींना वाम मार्गाला घेऊन जात असल्याचे दिसून येत असल्याने हा धोका असल्याचे दिसत आहे.
पुणे जिल्ह्यात पबमधून निघालेल्या युवकाकडून घडलेला भयानक अपघात देशभरात गाजत असून या अपघाताने वेगेळे वळण घेतल्याने काही पोलीस अधिकारी तसेच डॉक्टरांवर कारवाई होऊन निलंबन झाले. मात्र, शहरी भागामध्ये जसे पब धोकादायक आहेत. त्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी शाळा व महाविद्यालयच्या शेजारी असलेले कॅफे हे युवक व युवतींना वेगळ्या वळणावर घेऊन जात आहे.
अनेक कॅफे चालकांनी कॅफे व हॉटेलमध्ये बेकायदेशीर पार्टीशन टाकून पडदे लावून युवकांना अश्लील चाले करण्यासाठी एक आसरा दिल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी शिरुर तालुक्यात काही ठिकाणी पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. मात्र, त्यांनतर परिस्थिती जैसे थे अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कॅफे चालकांनी युवक व युवतींना बसण्यासाठी अलिशान पद्धतीने सोय केली आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या युवकांना बसण्यासाठी सवलत देऊन त्यांच्याकडून ठराविक रक्कम घेतली जात आहे.
कित्येक ठिकाणी युवतींचे विनयभंग झाल्याच्या घटना ताज्या आहेत. कॅफेमध्ये येणारे जाणारे सर्वच युवक युवती अल्पवयीन असून काही युवक अलिशान दुचाक्या घेऊन भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने कित्येक अपघात घडत आहेत. प्रशासन तसेच पालक जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
गाळा मालकांनी लक्ष द्यावे
ग्रामीण भागामध्ये असेलली कॅफे पद्धत चांगली आहे. मात्र त्यामध्ये युवक व युवतींसाठी करण्यात येणारी स्वतंत्र व्यवस्था ही बंद झाली पाहिजे, संबंधित जागा मालक अथवा गाळा मालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने देखील यावर अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचे सीमाई महिला आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमा पवार यांनी सांगितले.
पोलिसांची हप्तेखोरी बंद करा
शिरूर तालुका हा औद्योगिक आणि नागरिकीकरणामुळे सधन झाले आहे. रांजणगाव एमआयडीसीमुळे या भागात नागरिकीकरणाचा वेग वाढला आहे. उद्योग- व्यवसायाची चलती आहे. यातून अनेक डिकाणी गैरमार्गाने माया कमविली जात आहे. यात पोलीस हात धुऊन घेत आहेत. अवैद्य व्यवसाय सुरू झाल्यानंतर पोलिसांना बंद पाकिट दिले जात असल्याची चर्चा आहे. जोपर्यंत हप्तेखोरी थांबली जात नाही. तोपर्यंत हे व्यवसाय खुलेआमपणे सुरू राहणार आहेत. यासाठी सामाजिक संघटनांनी पोलिसांची हप्तेखोरी बंद करण्यासाठी आवाज उठविण्याची गरज आहे.





