पुणे जिल्हा : उजनीतील कृषी पंपांना आठ तास विद्युत पुरवठा

अजित पवार यांचे आदेश ; खडकवासला, नीरा डाव्या कालव्याला आजपासून आवर्तन
इंदापूर – खडकवासला व नीरा डावा या दोन्ही कालव्यांना रविवारी (21 जुलै) पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना दिले. त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यांच्या शेती पंपांना आठ तास वीज देण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.
जिल्हा नियोजन समिती पुणे येथील बैठकी दरम्यान आमदार दत्तात्रय भरणे यांनी विविध मागण्या मांडल्या. यावेळी सध्या खडकवासला व नीरा देवधर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दुसरीकडे मात्र या दोन्ही प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणार्या इंदापूर तालुक्यात पाऊस सध्या झालेला नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील खडकवासला व नीरा डावा कालव्याला पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी व तलाव भरण्यासाठी पाणी सोडावे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यांना आठ तास वीज द्यावी, अशी आग्रही मागणी शेतकर्यांच्या हितासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
भरणे यांची मागणी विचारात घेऊन अजित पवार यांनी अधकिर्यांना सूचना केल्या. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांचा आग्रह पवार यांनी मान्य केल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या या मागणीमुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.तसेच सध्या शेतात उभे असलेल्या पिकांना व नव्याने लागण केलेल्या ऊस पिकांनाही याचा फायदा होणार आहे.तसेच या दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्रात असणार्या गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांना भूमिगत जलस्त्रोत बळकट होऊन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर खडकवासला व नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व तलाव भरले जाणार असल्यामुळे शेतकर्यांचा आगामी काळातील शेती सिंचनाचा प्रश्न देखील मिटणार आहे.
याच बैठकीत आमदार भरणे यांनी उजनी बॅक वॉटर मध्ये शेतकर्यांना सध्या सहा तास वीज पुरवठा दिली जाते. ती आठ तास करण्यात यावी, अशी मागणी लावून धरल्याने, तात्काळ पालकमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यांना आठ तास करण्याच्या सूचना केल्या.





