Pune District : खेड टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न; जलजीवन मिशन अंतर्गत 158 पैकी 73 गावांच्या योजना पुर्णत्वात

राजगुरूनगर : खेड तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत 158 गावांत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना पैकी 73 गावांतील योजना पूर्ण झाल्या असून 21 गावांतील पाणी योजना पूर्णत्वाकडे आहेत. दुष्काळग्रस्त गावातील पाणी योजना पूर्ण करून ती गावे टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंता के. एन. खरात, शाखा अभियंता आनंद जकिणकर यांनी दिली.
खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना झाल्या आहेत होत आहेत. टँकरमुक्त तालुका करण्यासाठी माजी मांदार दिलीप मोहिते पाटील यांनी 188 गावांचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. त्यानुसार तालुक्यात 158 गावांमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. या योजनाअंतर्गत अनेक गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. योजना पूर्ण झालेल्या गावाचा पाणीप्रश्न सुटला आहे. खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी योजना योजनांसाठी वीज उपलब्ध नाही.
महावितरण कंपनीच्या आडमुठेपणामुळे योजना बंद आहेत. टंचाईग्रस्त गावांमधील पाणी योजना सुरू राहण्यासाठी महावितरण कंपनीने फेब्रुवारी ते जूनपर्यंत वीजजोडणी करावी जेणेकरून गावातील पाणी योजना उन्ह्याळात सुरू राहतील नागरिकांची पायपीट थांबेल. विजेच्या पुरवठ्या अभावी योजना बंद असल्याने नागरिकांचे मात्र पाण्यासाठी उन्ह्याळात हाल होणार आहेत.
सोलर योजनेसाठी 69 गावांचा प्रस्ताव
पाणी योजनांना लागणारी वीज उपलब्ध व्हावी यासाठी शासनाकडे पाणीपुरवठा विभागाने सोलर योजनेसाठी 69 गावांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तालुक्यातील साकुर्डी, गाडकवाडी, चिंचबाईवाडी, आणि जऊळके बुद्रुक या गावातील जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना सोलरवर सुरु झाल्या असून हि गावे टँकरमुक्त झाली आहेत. वाशेरे गावातील पाणी योजना सुरु झाली आहे मात्र वीज वितरण विभागाचे काम अपूर्ण असल्याने अडथळे येत आहेत.
खेड तालुक्यात 158 गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना सुरू आहेत त्यापैकी 73 गावांतील पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत तर 21 गावांच्या योजना पूर्णत्वाकडे आहेत. अनेक गावांमध्ये वीजपुरवठा मिळत नसल्याने पाणी योजनेला अडथळे येत आहेत. वीज बिलाचा प्रश्न असला तरी मार्च ते जून पर्यंत महावितरण कंपनीने वीजपुरवठा केला तर काही गावे टँकरमुक्त होतील. तालुक्यांतील 4 गावांमध्ये सोलर सिस्टीम बसविल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत आहे तर 69 गावांचे सोलर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.
– के. एन. खरात, उप अभियंता, खेड पंचायत समिती





