पुणे जिल्हा : लहरी वातावरणाचा द्राक्ष बागांवर परिणाम

उत्पादनात 15 ते 20 टक्के घट होण्याची भीती
डाऊनी, भुरी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
रामदास सांगळे
बेल्हे – बदलत्या हवामानाचा जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रतिकुल हवामानामुळे यंदा काही द्राक्ष बागेत घडनिर्मितीच झाली नाही तर काही बागेतील घड जिरल्याने द्राक्ष उत्पादनात 15 ते 20 टक्के घट होण्याची शक्यता शेतकर्यांनी वर्तवली आहे. डाऊनी व भुरी आदी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव द्राक्ष पिकावर वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकर्यांना द्राक्ष फवारणीचा खर्च अधिक प्रमाणात वाढला आहे. सध्या तालुक्यातील शेतांमधील द्राक्ष थिनिंग स्टेजला आहेत. त्यामुळे द्राक्षांचे छोटे मणी विरळ करण्याचे काम सुरू आहे.
वातावरणाचा फटका तालुक्यातील शेकडो एकर क्षेत्रातील प्रामुख्याने काळ्या जम्बो जातीच्या द्राक्ष बागांना बसला आहे. घडनिर्मिती न झाल्याने सुमारे 100 ते 150 एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांवर शेतकर्यांनी कुर्हाड चालवली आहे. जुन्या द्राक्ष बागा काढून पावसाळी वातावरणात तग धरणार्या नवीन परदेशी पेटंट व्हरायटीच्या द्राक्षबागा लावण्याच्या तयारीत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक आहेत. हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना औषध फवारणीचा खर्च अधिकचा वाढला आहे. महागडी खते व त्यावर असलेला जीएसटी यामुळे शेतकर्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. द्राक्षाच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत.
नाशिक परिसरांमधून या कामाचा अनुभव असलेले मजूर आणावे लागतात. त्यासाठी त्यांना आधी उचल रक्कम देऊन त्यांची राहण्याची खास व्यवस्था करावी लागते. या मजुरांची खास बडदास्त ठेवावी लागते. त्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर हे लोक निघून जातात. तर काही लोक पैशांची उचल घेतली, तरी रात्रीचे पळून जातात. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते. दरम्यान, द्राक्ष उत्पादक शेतकर्यांची ओळख श्रीमंत शेतकरी म्हणून आजवर होत होती. परंतु, गेल्या 10-12 वर्षांपासून द्राक्ष शेती कमालीची महाग झाली आहे.
जुन्नर तालुका प्रामुख्याने काळ्या जातीच्या (ब्लॅक) निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर मानला जातो. तालुक्यातील जम्बो द्राक्षाने चीन, बांगलादेश, दुबई, श्रीलंका आदी देशातील बाजारपेठ काबीज केली आहे. तालुक्यात बर्याच क्षेत्रात जम्बो, रेडम्लोब, शरद सीडलेस, तास ए गणेश, थॉमसन सीडलेस, सोनाका, किंगबेरी, क्रिमसन आदी जातीच्या द्राक्ष बागा आहेत. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका निर्यातक्षम जम्बो, रेडग्लोब, किंगबेरी या जातीच्या द्राक्ष बागांना बसत आहे.
जुन्नर तालुक्यात 8 ते 10 दिवस थंडी, तीन चार दिवस ढगाळ वातावरण, तीन चार दिवस दाट धुके असे सतत वातावरण बदलत आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये 1 हजार 20 हेक्टरमध्ये द्राक्ष बागा असून थंडी जास्त असल्यामुळे द्राक्षांवर बुरशी येते. तापमान सर्वसामान्य राहिले तर द्राक्षगडाची चांगली वाढ होते. ज्यांच्या पिकावर बुरशी प्रादुर्भाव झाला असेल, अशा शेतकर्यांनी योग्य त्या औषधांची फवारणी करावी. गेल्या वर्षी तालुक्यात 30 हजार टन द्राक्ष उत्पादन निघाले होते.
– गणेश भोसले, कृषी अधिकारी जुन्नर
रासायनिक फवारणी (प्रति लिटर पाणी)
मॅन्कोझेब (0.25 टक्के) 2.5 ग्रॅम किंवा क्लोरोथेलोनील (0.25 टक्के) 2.5 ग्रॅम किंवा मेटीराम (55 टक्के) अधिक पायराक्लोस्ट्रोबिन (5 टक्के डब्ल्यूजी) 1 ग्रॅम (संयुक्त बुरशीनाशक) किंवा टेब्युकोनॅझोल (0.1 टक्के) 1 मिलि किंवा हेक्साकोनॅझोल 1 मिलि किंवा प्रोपिकोनॅझोल 1 मिलि या प्रमाणे प्रति लिटर पाण्यात स्टिकर 0.6 मिलि याप्रमाणे मिसळून दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी
40 एकर क्षेत्रामध्ये द्राक्षाची बाग असून गेल्या वर्षी चांगले उत्पादन निघाले होते. यंदा द्रक्षावर बदलत्या हवामानामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. डाऊनी व मिलिबग रोगाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. द्राक्षे पीक हे नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्या लॉटरी सारखे असते. समाधान मात्र एवढेच असते की आपण आपल्या शेतात शेकडो लोकांना रोजगार देऊ शकतो. पैशांपेक्षाही हे समाधान मोठे आहे. शासनाने खते व औषधांवरील जीएसटी माफ करावी एवढी विनंती आहे.
– ज्ञानेश्वर पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, बोरी





