पुणे जिल्हा : विजेचे भारनियमन सुरू झाल्याने गणेशोत्सवावर विरजण

– आंबेगाव तालुक्यात भाविकांसह गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्र्यांची नाराजी
मंचर – आंबेगाव तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून गणेश उत्सवाच्या काळामध्ये महावितरण कंपनीकडून विजेचे भारनियमन सुरू झाल्याने गणेशोत्सवावर विरजण पडत आहे. या प्रकाराबद्दल भाविकांसह गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महावितरण कंपनीकडून विजेचे भारनियमन होऊ नये, अशी अपेक्षा गणेश उत्सव कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या विजेचे भारनियमन होऊ लागल्याने याचा फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. गणेशोत्सव सुरू असल्याने सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे. रात्रीच्या वेळी देखावे पाहण्यासाठी नागरिक मंडळामध्ये जात असतात. तसेच अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम हे रात्रीच्या वेळी होत असतात. अशावेळी रात्री विजेचे भारनियमन झाले तर या गणेशोत्सव मंडळांना याचा त्रास होत आहे.
अनेक मंडळांकडे जनरेटर सुविधा नसल्याने लाईट गेल्यानंतर मात्र त्यांच्या अनेक कार्यक्रमांवर विरजण पडत आहे. तसेच शेती पिकांना पाणीपुरवठा करत असतानाही विजेची एक ते दोन तासाचे विजेचे भारनियमन होऊ लागल्याने शेती पिकांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य ती कार्यवाही करावी व सध्या चांगल्या दाबाने वीजपुरवठा शेती पंप व घरगुती वापरासाठी द्यावा. त्याचप्रमाणे रात्रीचे वेळी कुठल्याही प्रकारची लाईट बंद करू नये.
पाऊस थांबल्याने सर्वत्र शेती पंपाला विजेची मागणी वाढली आहे. विजेची मागणी वाढल्याने वीज सबस्टेशन मधील रोहित्रावर ताण येतो. पर्यायाने वीजपुरवठा खंडित होतो. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहेत, तसेच गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम सादर करण्यासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.
– शांताराम बांगर, कार्यकारी अभियंता, महावितरण, मंचर.





