Pune District :सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष बागांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव

वडापुरी – इंदापूर तालुक्यातील पूर्व भागात द्राक्षबागांवर सततच्या हवामान बदलामुळे डाऊनी करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता आणि वारंवार बदलणारे तापमान, यामुळे उत्पादक संकटात सापडले आहेत.
सध्या इंदापूर तालुक्यातील वडापुरी परिसरातील द्राक्ष शेतीमध्ये मालकाडी तयार करणे आणि काही ठिकाणी मालछटणीच्या कामांना सुरुवात झाली असताना, रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. जून-जुलै महिन्यातील सततच्या ढगाळ हवामानामुळे आणि हलक्या ते मध्यम पावसानंतर येणाऱ्या
कडक ऊनामुळे द्राक्ष बागांमध्ये ओलावा आणि उष्णता टिकून राहते. यामुळे डाऊनी मिल्ड्यू आणि भूरीसारख्या बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण मिळते. पानांवर ओलावा साचणे आणि उष्णतेमुळे बुरशी व जिवाणूंचा प्रसार झपाट्याने होत आहे. याचा परिणाम कोवळ्या फुटी आणि पानांवर होऊन उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.
नियमित पाहणी आवश्यक….
भाटनिमगाव येथील द्राक्ष बागायतदार आकाश गायकवाड यांच्या मते सध्या मालकाडी आणि मालछटणीच्या कामांदरम्यान नियमित बाग पाहणी आणि योग्य वेळी फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या हवामान सतत बदलत असल्याने द्राक्षबागामध्ये आद्रतेचे प्रमाण ८० ते १०० टक्के आहे. तसेच तापमान ३०० ते ३२ डिग्रीपर्यंत राहत आहे. अशा वातावरणामुळे वेलीची शाकीय वाढ आणि बगल फुटी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे झाडावर शाखांची गर्दी दिसून येते. असे रोगासाठी पोषक असते. त्यामुळे सध्या डाऊनी करपा असे रोग द्राक्ष बागांमध्ये दिसून येत आहे. खास करून नवीन कोवळ्या फुटींवर डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.





