पुणे जिल्हा : मांजरी बाजारात दुबार विक्री बंद

शेतकऱ्यांना थेट विक्री करता येणार
बळीराजाची यंदा दिवाळी जोरात
सोरतापवाडी – मांजरी उपबाजारात संचालक मंडळाने दुबार विक्री बंद केल्यामुळे यंदा शेतकरी दिवाळी जोरात साजरी होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आशावादी बनला आहे.
दुबार विक्री बंदमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव पण चांगला मिळत असून उठाव होत आहे. याबाबत दैंनिक प्रभातने सतत शेतकऱ्यांची बाजू मांडून दुबार विक्रीबाबत आवाज उठवला होता. एक वेळ अशी होती की, शेतकरी उपाशी दुबार विक्रेते तुपाशी असे विदारक चित्र होते. आता शेतकरी उपाशी न राहता बाजारभावामुळे शेतकऱ्यांची बोटे तुपात आहेत. बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले आहेत.
हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार शेतकऱ्यांसाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आला आहे. उपबाजारात शेतकरी उपाशी असून दुबार विक्रेते दोन ते तीन तासांच्या विक्रीतून मालामाल होत होते. हा बाजार फक्त शेतकऱ्यांच्यासाठी तयार केला असून शेतकरी ते थेट विक्रेते, असे बाजाराचे स्वरूप आहे. पण दुबार विक्रेते दररोज दहा ते अकरा वाजता येऊन बाजारात स्वतःची जागा असल्यासारखी जागा पकडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर माल विकावा लागत होता. आता दुबार विक्री बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात भरपूर जागा उपलब्ध झाली
आहे. माल पण व्यवस्थित ठेवता येतो. बाजारात गेल्यानंतर दुबार विक्रेते बाजार फुटायच्या आधी कमी किमतीत माल घेत होते. तोच माल बाजार फुटल्यानंतर विकत होते. परिणामी मालाची किंमत बाजार फुटायच्या आतच व्यापारी व दुबार विक्रेते फिक्स करीत होते. त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव मिळत नव्हता. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जाऊन मोठा फटका बसत होता.
संचालक मंडळाने बाजार फुटल्यानंतरच व्यापाऱ्यांना माल खरेदी करण्यासाठी आत सोडले जात आहे. त्यामुळे बाजारात होणारी फिक्सिंग बंद होऊन बाजारभाव पण शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळत आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी जोरात होणार आहे. शेतकऱ्यांना यंदाच्या दिवाळीत सोन्याचे दिवस येणार असल्याचे शेतकरी भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले.
अल्पभूधारकांसाठी निर्मिती – चौधरी
बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी म्हणाले की, मुळात मांजरी उपबाजाराची संकल्पना शेतकरी ते थेट ग्राहक आहे. त्यामुळे एक ते दोन एकर वाले शेतकऱ्यांना पुण्याला किंवा मुंबईला न जाता येथे माल घेऊन थेट ग्राहकांना विकावे म्हणून या बाजाराची निर्मिती केली आहे. दुबार विक्री बंद मुळे हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना एक चांगला बाजार भाव मिळत आहे. यंदा शेतकऱ्यांची दिवाळी नक्कीच जोरात होणार आहे.





