पुणे जिल्हा : दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा मुंबईचे दूध रोखू

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांचा इशारा
मंचर – राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, लिटरला चाळीस रुपये बाजार भाव द्यावा. अन्यथा मुंबईला जाणारे दूध रोखले जाईल, असा इशारा पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकारी पुणे यांना पाठवलेल्या निवेदनात प्रभाकर यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर ३० रुपये आणि ५ रुपये अनुदानाची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ३० रुपये दर हा खाजगी व सहकारी दूध संघानी शेतकऱ्यांना द्यायचा आहे आणि पाच रुपये अनुदान राज्य सरकार देणार आहे. परंतु शेतकऱ्यांची मागणी लिटरला ४० रुपये भाव द्यावा.
कारण दूध उत्पादन परवडत नाही. दुधाचा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. दूध भुकटीचे बाजार भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कमी झाल्याचे कारण सांगून खाजगी व सहकारी दूध संघाने दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कमी केले होते. त्याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या हीवेळी ३५ रुपये सुद्धा भाव शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण खाजगी व सहकारी दूध संघ ३० रुपये दर देतील, याची सरकार खात्री देणार आहे का? आणि ज्या अटी शर्ती लावलेल्या आहेत. त्या रद्द करणार आहेत का? तरच शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो. असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केला आहे.
४० रुपये भाव घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही
दुधाला ४० रुपये दर दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल. वेळप्रसंगी मुंबईला जाणारा दूध पुरवठा देखील रोखून धरला जाईल, असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे





