पुणे जिल्हा : एलिव्हेटेड कॉरिडॉरवर श्रेयवादाची लढाई नको ; आमदार मोहिते पाटील

राजगुरूनगर :राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला केंद्रा सरकारने मंजुरी दिली असून त्यासाठी सर्वानी प्रयत्न केले. त्याचे श्रेय घेण्यापेक्षा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे. याला मी महत्त्व देईल, श्रेयवादाची लढाई कोणी लढू नये, असे मत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आमदार मोहिते पाटील म्हणाले की, सद्य परिस्थतीत चाकण वाहतूक कोंडी प्रश्न ऐरणीवर होता. सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त होते. अनेकांनी रस्त्यालगत अतिक्रमणे झाली होती. दुकाने रस्त्यावर आली. ग्राहकांच्या गाड्या महामार्गावर लागत होत्या. त्यातच एमआयडीसी असल्याने राज्यभरातील चार हजार रिक्षा चाकण शहरात आल्या पर्यायाने त्या महामार्गावर थांबल्याने वाहतुकीला अडथळा झाला. वाहतूक कोंडी हटविण्यासाठी आंदोलने झाली.
त्याची तातडीने दखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली. जिल्ह्याचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी पाहणी केली आणि चाकण मधील पुणे नाशिक महामार्गावरील अतिक्रक्रमणे हटवण्याचा अहवाल दिला. त्यानुसार तात्काळ कारवाई करीत दोन दिवसांपूर्वी चाकण शहरातील पुणे नाशिक रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली यात अनेकांचे संसार रस्त्यावर आले. मात्र अतिक्रमणे काढणे नित्याचे होते. अतिक्रमणे काढली मात्र विजेचे खांब काढणे महत्त्वाचे आहे ते काढले नाही तर त्यांचा आधार घेत पुन्हा अतिक्रमणे होतील म्हणून विजेचे खांब शिप्ट करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय रस्त्याची रुंदी आणि गटार कामाला 10 कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
हा प्रश्न सुटला याला महत्त्व
गेली 20 वर्षांपासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महामार्ग रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न केले होते, त्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह खेड तालुक्यातील काही नागरिक प्रयत्नशील होते. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी व सरकाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा आंदोलने झाली होती, त्यामुळे याचे श्रेय कोणाला न देता हा प्रश्न सुटला त्याला महत्त्व आहे.
निवडणुकीत जनतेला नक्की फायदा होणार
खेड तालुक्यात आर्थिक सुबत्ता आली आहे. अनेकांकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे आले असल्याने ते विधानसभेची स्वप्न पाहत आहेत अनेक जण विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक झाले आहेत. त्याचा या निवडणुकीत जनतेला नक्की फायदा होणार आहे. आखाड पार्ट्या, देव दर्शन, फ्लेक्सबाजी सुरु आहे.जितके जास्त उमेदवार तेवढी निवडणूक सोपी होणार आहे. मी कोणावरही टीका टिपणी करणार नाही कोणाची उणीधुणी काढत बसणार नाही. मी विकासाला महत्त्व दिले आहे, पुढे ही देणार आहे. मी फायद्यासाठी इतर उमेदवार उभे करणार ही चर्चा चुकीची आहे, असेही आमदार मोहिते यांनी सांगितले.





