Pune District: अजित आणि माझ्याशी युगेंद्रची तुलना नको

बारामती : आमच्यासोबत सत्ता होती. सत्तेमुळे अनेक कामे होतात. आत्ता युगेंद्रकडे सत्ता नाही. तो सत्ता नसताना गोरगरिबांसाठी संघर्ष करतोय. तो गोष्टी समजून उमजून घेतो. त्याचा स्वभाव सुसंवाद ठेवण्याचा आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी नातवाचं कौतुक केले. कधीपर्यंत वाढदिवस एकट्याने साजरा करायचा आणि एकट्याचे अभिनंदन करायचे, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
आता आयुष्यात सोबती हवी, असा नकळतपणे चिमटा काढून ‘नात सून आणा’, असेच शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना सांगितले. युगेंद्र श्रीनिवास पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने वाढदिवस साजरा करण्यासाठी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेमध्ये कार्यकर्ते जमले होते.
शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये युगेंद्र पवारांचा वाढदिवस व्हावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये केक कापण्यात आला. यानिमित्ताने शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि युगेंद्र पवार यांनाही मार्गदर्शन केले.





