पुणे जिल्हा :देशांतर्गत बाजारात साखरेचे मार्केट डाऊन

दरासह मागणीदेखील रोडावली ः गतवर्षीपेक्षा उत्पादन वाढल्याचा परिणाम, कारखानदार चिंतेत
रमेश जाधव
रांजणी- गेल्या काही दिवसापासून साखरेचे बाजार भाव गडगडलेले पाहावयास मिळत आहेत. खरे तर यंदा साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असल्याने आणि त्यातच साखरेलाही मागणी नसल्याने देशांतर्गत बाजारांमध्ये साखरेचे मार्केट डाऊन झाल्याचे चित्र पाहायला मिळते. साखर उत्पादन वाढीचा सातत्याने होणारा अंदाज आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे वाढलेले उत्पादन याचा विपरीत परिणाम साखरेचे दर कोसळण्यावर झाला आहे.
मुळातच चालू वर्षी साखरेचे उत्पादन अनेक पटीने वाढले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात साखरेचे दर प्रति क्विंटल 3100 ते 3200 रुपयांखाली उतरले आहेत. जानेवारी 2022 पासून साखरेच्या किमतीची ही परिस्थिती कायम असल्याने साखर कारखानदार अक्षरश: चिंतेत आहेत. खरेतर देशांतर्गत बाजारात कुठेच साखरेला फारशी मागणी होत नसल्याने बहुतांशी साखर कारखानदारांनी एमएसपीपेक्षाही कमी दराने साखर विक्री करण्याची तयारी दाखवली आहे. एकीकडे जागतिक बाजारपेठेत ठराविक अंतराने साखरेचे दर कमी जास्त होत असले तरी देशांतर्गत बाजारात मात्र घसरलेले दर वाढण्यास तयार नसल्याने साखर कारखानदारांची अस्वस्थता
वाढली आहे.
चालू वर्षी देशात ज्या-ज्या ठिकाणी ऊस पिकविला जातो, अशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले गेले. त्यातून मोठ्या प्रमाणात साखर निर्मिती झाली आणि हीच साखर निर्मिती दर घसरण्यास कारणीभूत ठरली आहे. सहा महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची चणचण राहण्याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला होता. त्यामुळे भारतीय साखरेला मागणी कायम राहील असा अंदाज होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021च्या कालावधीत साखरेच्या दराने क्विंटलला 300 ते 400 रुपयांनी उसळी घेतली. प्रति क्विंटलला 3800 रुपयांपर्यंत दर वाढले; परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. दिवाळीमध्ये साधारणतः तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत साखरेचे दर होते. दिवाळी झाल्यानंतर दराला लागलेले ग्रहण अद्यापही कायम आहे.
गेल्या महिनाभरात देशात बहुतांश ठिकाणी थंडीची लाट आहे. त्यामुळे शीतपेये व अन्य व्यावसायिक कंपन्या साखर खरेदीसाठी धजावत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. अगदी माफक प्रमाणात साखर विकली जात असल्याने साखर कारखान्यांपुढे शिल्लक साखरेचा डोंगर यंदाही कायम राहण्याची भीती व्यक्त केली जाते. केंद्राने दोन महिन्यांपूर्वी साखरेचे विक्री कोटे वाढवून दिले असले तरी त्याचा फारसा सकारात्मक परिणाम साखरेची उचल होण्यावर झाला नसल्याचे साखर कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले.
सुरुवातीच्या काळात काही साखर कारखान्यांनी कच्ची साखर तयार करून त्यांची विक्री केली आहे; परंतु आता कच्च्या साखरेचे दरही 3100 रुपयांपर्यंत आल्याने या साखरेची विक्री करणे ही कठीण बनल्याचे साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दर वाढण्याची उन्हाळ्यात आशा
सद्यस्थिती पाहता देशांतर्गत बाजारात साखरेचे मार्केट डाऊन झाल्याने आता साखर कारखान्यांचे उन्हाळ्याकडे लक्ष लागून राहिले आहे. आगामी उन्हाळ्याच्या दोन तीन महिन्यांमध्ये शीतपेय व अन्य ग्राहकांकडून साखरेची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे साखर कारखानदारांचे लक्ष येत्या दोन-तीन महिन्यांकडे लागून राहिले आहे. करोनाने डोके वर न काढल्यास उन्हाळ्यात बाजारपेठा पूर्ववत होतील आणि त्याचा फायदा साखर विक्रीला काही प्रमाणात होण्याचा विश्वास कारखानदार सूत्रांनी व्यक्त केला.
उत्तरेकडील राज्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक आणि अन्य राज्यातील साखर स्वस्त पडते. त्यामुळे जी काही साखर विकली जात आहे ती याच राज्यातून विकली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या उच्चांकी उत्पादन होणाऱ्या राज्याला मंदीचा सामना करावा लागत आहे.
-बाळासाहेब बेंडे पाटील, अध्यक्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पारगाव





