Pune District : आमचं आयुष्य सरकारला दिसतच नाही का?

साबुर्डी आदिवासी वस्त्यांचा आक्रोश ः रुग्णांना झोळीत घालून नेण्याची वेळ
रामचंद्र सोनवणे
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील साबुर्डी गावातील जाखलेवाडी, कुंभारदरी, जुनावणे वस्ती आणि दोरेवस्ती या आदिवासी वस्त्यांमध्ये आजही रस्ता, पाणी, आरोग्य अशा मूलभूत सुविधांचा थांगपत्ता नाही. रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागलं तर झोळीत घालून डोंगर उतरणं ही आमचीच शोकांतिका आहे. कित्येकांचे जीव गमावले. सरकारच्या योजना कागदावर आहेत, पण आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत, असा जळजळीत आक्रोश ग्रामस्थांनी व्यक्त केला.
रस्त्याअभावी गरोदर महिला, आजारी रुग्ण किंवा सर्पदंशग्रस्त नागरिकांना दवाखान्यात पोहोचवणे म्हणजे अक्षरशः जीवाशी खेळ. अनेकदा विलंब झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आजारी माणूस उठवून गाडीला बसवण्याचा पर्याय आम्हाला नाही. झोळीत घेऊन चालतच न्यावं लागतं. कधी तो रुग्ण जगतो, कधी नाही. हा आमचा रोजचा लढा आहे, असे ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले.
दरम्यान, प्रशांत गोपाळे यांनी स्वतःच्या पुढाकारातून काही वस्त्यांमध्ये जाण्यासाठी रस्ता तयार केला, पाण्याच्या टाक्या व मोटार बसवून पाणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांचा सवाल कायम आहे – किती दिवस आम्ही तात्पुरत्या उपायांवर जगायचं? सरकारने आम्हाला कायमस्वरूपी रस्ता, पाणी, आरोग्य द्यायलाच हवं.
मंत्र्यांचे आदेश, ग्रामस्थांमध्ये आशा
या हालअपेष्टा लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गोपाळे यांनी अमित सोनवणे व अशोक टाव्हरे यांच्यासह आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भेट घेतली. ग्रामस्थांची दाहक व्यथा त्यांनी थेट मंत्र्यांसमोर मांडली. मंत्री उईके यांनी प्रकल्प अधिकारी, घोडेगाव यांना तातडीने स्थळ पाहणीचे आदेश दिले आहेत. लवकरच ठोस उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन देताच ग्रामस्थांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला.





