भोरमध्ये झोपडपट्टीवासियांची हृदयदावक हाक दत्तात्रय बांदल भाटघर – सद्यस्थितीला भोरमधील नवी आळी येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे काम चालू आहे. याठिकाणी गेल्या पन्नास वर्षांपासून २७ झोपडपट्ट्या वास्तव्यास होत्या. गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय इमारत बांधायची असल्याच्या कारणाने या सर्व झोपडपट्ट्या हटवल्या होत्या. तसेच नीरा नदी घाट सुशोभीकरणाचे काम करण्यासाठी ४ झोपड्या, अशा एकूण ३१ झोपड्या हटवल्या होत्या. झोपडपट्टी हटवताना घरकुले देण्याचे आश्वासन सदर झोपडपट्टीवासियांना दिले होते. परंतु अद्याप घरकुले न मिळाल्याने त्या नागरिकांना पत्रा शेडमध्ये राहावे लागत आहे. ही पत्रा शेड कॅनॉललगत असल्याने लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहेकुणी घर देता का घर ?, अशी हृदयद्रावक हाक झोपडपट्टीवासियांनी नगरपरिषदेला घातली आहे. भोर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नवी आळी परिसरात नगपरिषदेच्या मालकीची जागा होती. या जागेवर सुमारे पन्नास वर्षांपासून २७ कुंटुंबे पत्राशेड व कच्चे बांधकाम करून राहत होती. या २७ कुटुंबीयांना आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशन, मतदान कार्ड मिळालेले आहे. वीज महावितरणकडून विजेचे मीटरही देण्यात आले होते. नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. तर काहींना घरपट्टी, पाणीपट्टीची आकारणी सुरू होती. भोर शहरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावीत ही संकल्पना पुढे आली. यासाठी नवी आळीतील संबंधित जागेची निवड करण्यात आली. सदर जागेचा ताबा मिळवण्यासाठी नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्तात सदरच्या सर्व झोपड्या हटवल्या. यावेळी घरकुले बांधून देण्याचे व तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नगरपरिषदेने दिले होते. भोर नगरपरिषदेने नवी आळीतील २७ पैकी १३ झोपडपट्टीधारकांना भोर-महाड रस्त्याच्या शेजारी अभिजीत मंगल कार्यायासमोर पत्र्याचे शेड उभारून दिले आहे. परंतु हे पत्रा शेड नीरा देवघर धरणाच्या कालव्यालगत असल्याने लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी पत्र्याचे शेड झुडपांनी ग्रासले आहे. या ठिकाणी अडचण निर्माण झाली असून उंदीर, घुशी, साप, विंचू यापासून धोका निर्माण झाला आहे. मोठमोठे गवत उगवले असल्याने डासांचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. या १३ झोपडपट्टीवासियांमध्ये फक्त एकच नळ कनेक्शन दिले आहे. दिवसातून फक्त एकच तास नळ कनेक्शनला पाणी असते. सद्यस्थितीला दिवसाआड पाणी येते. यामुळे पाण्याचा तुटवडा भासत आहे. “१४६० च्या जमिनीच्या मोजणीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर म्हाडाच्या सहाय्याने स्वतःची जमीन नसलेल्या लोकांसाठी एएचपी अंतर्गत घरकूल योजना राबवण्याचे नियोजन असून त्यासंदर्भात अर्ज घेण्याचे प्राथमिक काम सुरू आहे.” – गजानन शिंदे, मुख्याधिकारी, भोर नगरपरिषद ” आमच्या झोपड्या हटवताना घरकुले बांधून देण्याचे आश्वासन नगरपरिषदेने दिले होते. नगरपरिषदेने आमची तात्पुरती सोय करून दिली आहे. परंतु या ठिकाणी बऱ्याच संकटांना सामना करावा लागत आहे. आम्ही सर्वांनी घरकुलसाठी अर्ज भरले असून नगरपरिषदेने आम्हाला लवकरात लवकर पक्की घरे द्यावीत, अशी विनंती आम्ही नगरपरिषदेकडे करीत आहे. “ – विजय हनुमंत सोनझारीका,झोपडपट्टीधारक.