पुणे जिल्हा : लोकांची कामे करा, पक्ष तुमची दखल घेईल

शरद बुट्टे पाटील : पाबळमध्ये भाजपची कार्यशाळा
पाबळ : पदाधिकाऱ्यांनी भाजपचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. सर्वसामान्यांची कामे करायची आहेत तरच तुम्हाला तुमच्या पदाची उंची वाढवता येईल आणि पक्ष तुमच्या कार्याची दखल आपोआप घेईल, असे प्रतिपादन भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी केले.
पाबळ येथे शिरुर तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा नुकतीच झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते शिरुर तालुक्यांतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
बुट्टे पाटील यांनी भाजपची ध्येय धोरणे, कार्य पध्दत आणि जागतिक पातळीवरील कामाची माहिती सांगून प्रोत्साहित केले. यावेळी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर,पाबळचे माजी सरपंच सोपान जाधव, विद्यमान सरपंच सचिन वाबळे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी चव्हाण, जातेगावचे सरपंच समाधान डोके आदींनी मनोगत व्यक्त केले.
बुट्टे पाटील म्हणाले की, सरकारी कार्यालयात जायचे आहे. गावागावात घराघरात पोहोचायचे आहे. लोकांकडे स्वतः जायचं. त्यांची छोटी मोठी कामे करून द्यायची. आपल्या कामाचे मूल्यमापन आपणच करायचे. यासाठी आपले कार्ड छापा, शुभेच्छांचे बोर्ड लावा, आपले फोटो ठेवा, वेळप्रसंगी प्रत्येक निवडणूक लढवा. अडचण आली तर संपर्क करा. लक्षात ठेवा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार आहे. यावर विश्वास ठेवा. पक्ष तुमच्या कार्याची दखल नक्कीच घेईल.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य माऊली साकोरे, तालुका महिला अध्यक्षा कविता गलांडे, महिला आघाडी अध्यक्षा वैशाली रांधवन, युवा मोर्चाचे अध्यक्ष एकनाथ मासळकर, सदस्य हर्षद जाधव, सचिव अमोल बोराडे, कामगार आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब ढोकले, किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब साकोरे, अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष बाबाजी गव्हाणे, सदस्य सचिन गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल जाधव, युवा मोर्चाचे सदस्य संदीप बगाटे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी शिरूर तालुकाध्यक्ष माजी सरपंच मारुती शेळके यांनी शिरूर तालुक्यातील 39 गावात केलेल्या संघटन कार्याचे विशेष कौतुक केले. समाधान डोके यांनी प्रास्ताविक केले तर माऊली साकोरे यांनी आभार मानले.
माझी शिरूर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर 39 गावांत भाजपचे अस्तित्व नसताना नवे पदाधिकारी मिळवून गावागावांत पोहोचून भाजपचे विचार पोहोचवले. यातून आज किमान दीडशे पदाधिकाऱ्यांचे नवे संघटन निर्माण केल्याचा मला आनंद आहे. त्याच कार्याची पावती म्हणून जिल्हाध्यक्षांनी केलेले कौतुक मला पुढील कार्यासाठी अधिक प्रेरणादायक ठरणार आहे.
– मारुती शेळके, तालुकाध्यक्ष, भाजप, अध्यक्ष.





