पुणे जिल्हा : तंटामुक्त पदाधिकारी फक्त नामधारी

गावागावांतील समितीचे फलक गायब ः अभियानाला बळकटी देण्याची गरज
प्रमोल कुसेकर
मांडवगण फराटा – ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड केली जाते. परंतु या तंटामुक्त समितीमध्ये किती नागरिक आणि कोण नागरिक आहेत. याची पाटी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कोरीच असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रत्येक गावात ही समिती कार्यरत आहे.
अनेक गावांना तंटामुक्तीबाबत पुरस्कारही मिळालेले आहेत. परंतु या समितीचे अध्यक्ष सोडले तर इतर सहभागी सदस्यांची नागरिकांना माहितीच नसते. तंटामुक्त समितीचा फलक ग्रामपंचायतींमध्ये लावणे बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये समितीचे फलकच नसल्याचे निदर्शनास येत आहे.
न्यायव्यवस्थेवरील ताण काही प्रमाणात कमीव्हावेत, दिवाणी दावे, बांधावरील वाद व गावातील किरकोळ वाद हे गावामध्येच मिटविण्यासाठीशासनाने गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती ही योजना अंमलात आणली. या योजनेमध्ये ग्रामसभेतून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवडली जाते.
या अध्यक्षाच्या खालोखाल सर्व समावेशक सदस्यांची निवड केलीजाते. परंतु यामध्ये असणाऱ्या सदस्यांची नावे मात्र राजकीय कुरघोड्यांमुळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावली जात नाही, असे चित्र सध्या जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे.
ग्रामीण भागात अजूनही तंटामुक्ती अभियानाबाबत पूर्णपणे जनजागृती झालेली दिसुन येत नाही. गावातील कोणताही तंटा मिटवताना या तंटामुक्त समितीमध्ये जे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांना तंटा मिटवण्यासाठी बोलविणे गरजेचे असते. परंतु बऱ्याच गावांमध्ये सदस्यांऐवजी फक्त अध्यक्षांना तंटा मिटवण्यासाठी बोलविले जाते. गावपातळीवर गावाच्या माध्यमातून निवडण्यात आलेली महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पासून ते सर्व सदस्यांपर्यंत ज्यांची निवड झालेली आहे.
त्या सर्वांना तंटा मिटवण्यासाठी आम्ही निमंत्रित केले जात नसल्याने त्या सदस्यांमध्ये नाराजी पसरली जात आहे. ही योजना अजुनही बळकट सक्षम करण्यासाठी गावपातळीवर या अभियानाला बळकटी मिळण्याची गरज आहे, असे मत जाणकारांमधून व्यक्त होत आहे.
प्रत्येक गावात असलेल्या दोन गटांमुळे तंटामुक्त अध्यक्षाला कामे करताना खूप अडचणी येतात. परिणामी राजकारणामुळे जाणूनबुजून ग्रामपंचायतीत तंटामुक्त समितीचा नामफलक लावला जात नाही.
– पांडुरंग हंडाळ, अध्यक्ष तंटामुक्त समिती, आंधळगाव
तंटामुक्त अध्यक्ष वाद मिटवण्यासाठी असतो. परंतु अध्यक्ष निवड जनतेतून होत असल्याने विरोधी गटाचा अध्यक्ष झाल्यास ग्रामपंचायत पदाधिकारी त्याचे नाव ग्रामपंचायतीत टाकण्यास टाळाटाळ करतात. असे न करता सर्वसमावेशक कामकाज होणे गरजेचे आहे.
– योगेश ओव्हाळ, माजी तंटामुक्त अध्यक्ष, शिंदोडी





