Pune District : बॅटरीचा करंट देऊन बैल पळवल्याचा घृणास्पद प्रकार उघड

मंचर : बैलगाडा घाटात बैल जोरात पळण्यासाठी बैलगाडा मालकाची बारी बसण्यासाठी बैलांना इंजेक्शन, उत्तेजक द्रव्य देण्याचे प्रकार या अगोदर घडले आहेत. मात्र, आता बैल जोरात पळण्यासाठी त्याला इलेक्ट्रिक बॅटरीचा करंट देऊन पळवले जात असल्याचा प्रकार निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथील घाटात उघडकीस आला असून बैलाबाबत असे चुकीचे कृत्य करणाऱ्यांना आंबेगाव तालुक्याच्या कुठल्याही घाटात गाडा पळवून दिला जाणार नाही, असा निर्णय आंबेगाव तालुका अखिल भारतीय यात्रा कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे.
बैलगाडा शर्यतीत बैलांना काठीने, चापकाने मारहाण होते.त्यांना उत्तेजक द्रव्य दिले जाते. अनेकदा घाटात बैलाचा अपघात होऊन बैल मृत्यूमुखी देखील पडतो. त्यामुळे काही वर्षांपूर्वी बैलगाडे पळवण्यावर बंदी घालण्यात आली होती. दहा-बारा वर्ष मोठे प्रयत्न करून बैलगाडा मालक अनेक राजकीय नेत्यांनी पाठपुरावा करून बैलगाडा शर्यत सुरू केली. मात्र, बैलगाडा शर्यतीत आता पुन्हा बैलांना त्रास दिला जात असून असाच त्रास सुरू राहिला तर पुन्हा बैलगाडा शर्यत बंद पडेल.अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
निघोटवाडी ता.आंबेगाव येथे एका बैलगाडा मालकाने बैल जोरात पळण्यासाठी त्यांना बॅटरीचा करंट देण्याचा प्रकार घडला.त्यावेळी अखिल भारतीय यात्रा कमिटीचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. यापुढील काळात असे गैर कृत्य करणाऱ्यांना आंबेगाव तालुक्यातील घाटात गाडा पळून दिला जाणार नाही व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे. अनेक शेतकरी बैलगाडा मालक पळणाऱ्या बैलांची पोटच्या मुलासारखी काळजी घेतात.त्यांना घरी वेगवेगळ्या खुराक खायला घालतात.तर काही बैलगाडा मालक स्वतःच्या नावासाठी घाटात बारी बसण्यासाठी बैलांना वेगवेगळे इंजेक्शन देतात.
असे प्रकार करणे चुकीचे आहे.बैलांना कोण डॉक्टर चुकीचे इंजेक्शन देत असेल तर त्या डॉक्टरचा देखील समाचार घेतला जाईल.बैलगाडा ही जुनी परंपरा आहे.ती आपल्याला टिकवायचे आहे.खानदानी बैलगाडा मालक बैलांना त्रास देत नाही. त्यामुळे यापुढील काळात बैलगाडा मालकांनी काळजी घ्यावी.असे आवाहन पुणे जिल्हा बैलगाडा चालक मालक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष जयसिंग एरंडे यानी केले.
निघोटवाडी घाटात बॅटरीच्या साह्याने बैलाला करंट देताना स्वयंसेवकांनी पाहिले आणि लगेचच आम्ही ग्रामस्थ म्हणून दखल घेऊन कार्यवाही केली. तो बैलगाडा इनामात धारला नाही आणि त्याचे सेकंदही पुकारले नाही. यापुढे असे कृत्य सहन केले जाणार नाही. नाहीतर कायदेशीर कारवाई करावी लागेल.
-शिवाजीराव निघोट, प्रसिद्ध बैलगाडा मालक, माजी सरपंच निघोटवाडी.
बैलगाडा मालकांनी बैल पळण्यासाठी कोणतेही उत्तेजक पदार्थ देऊ नये.चांगल्या प्रकारे आहार देऊन बैल पळताना आनंद घेतला पाहिजे. जर चुकीचे कृत्य झालं आणि कोर्टात कोणी गेलं तर बंदी येईल.याची काळजी सर्वांनी घ्यावी.प्रत्येक बैलगाडा मालकांनी प्रामाणिकपणे बैलांशी वागून आपले नाव कमवावे,गमवू नये.
-रामकृष्ण टाकळकर, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे प्रमुख.





